Solapur, 16 May : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी नोटीस देऊन चौकशीसाठी हजेरी न लावल्याने वडूज पोलिसांनी अखेर आज विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी हजेरी लावली आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावर आता खुद्द गोरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या बदनामी प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच, आठवडाभरापूर्वी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अकरा जणांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहे. माजी आमदार घार्गे यांनी वडूज पोलिस ठाण्यात चौकशी वकिलासह हजेरी लावली होती.
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी चौकशीसाठी मुदत मिळावी, अशी मागणी केली हेाती. तसेच तब्येतीचे कारण देऊन पोलिस चौकशीला येण्याचे टाळले होते. त्यानंतर आज वडूज पोलिस हे रामराजे यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. ते रामराजेंची चौकशी करत आहेत. त्यावर मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया आली आहे.
गोरे म्हणाले, माझ्या बदनामी प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय द्वेष करण्याचा किती प्रयत्न करावेत, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना संपवण्याचे काम केले आहे. तसेच, नव्या नेतृत्वाला संपविण्याचे काम त्यांनी केलेले आहे. माझ्याही पाठीशी गेली 17 वर्षांपासून हा संघर्ष होता.
मी मंत्रिपदाची शपथ घेऊन काम सुरू केल्यानंतर त्यांनी कळस गाठला होता. पण, परिणाम आपण बघितला असेल. काही तरी षडयंत्र करायचं, त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपविण्याचा घाट त्यांनी घातला हेाता. अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो, तेव्हा आपल्यासाठी तो आपोआप तयार होतो. ती परिस्थिती आज निर्माण झाली आहे, असे सांगून माझ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात रामराजे स्वतः अडकल्याचे गोरे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
आयुष्यभर शकुनीमामाचं काम केलं. आता परिस्थिती उलटी झालेली आहे. तसेच, सगळ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्या दोघांच्या (रामराजे आणि संबंधित महिला) संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग समोर आलेले आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. षडयंत्र समोर आलं आहे. कशा पद्धतीने प्लॅन होता, पैसे कोणाकडे पाठवायचे, कोणी द्यायचे, हे सर्व पुढे आलेले आहे. या सर्व तपासाच्या अनुषंगाने पोलिस रामराजेंच्या घरी गेलेले असावेत, असा दावाही जयकुमार गोरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.