
Solapur, 16 May : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला येत्या दोन दिवसांत महिना पूर्ण होत आहे. मात्र, पोलिस अजूनही आत्महत्येच्या ठोस कारणांपर्यंत पोचू शकलेले नाहीत. पोलिसांचा तपास वळसंगकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे मानेच्या भोवतीच केंद्रीत असल्याचे दिसून येत आहे. या चौकशीदरम्यारच पोलिसांनी मुसळे माने आणि पाच साक्षीदारांना समोरासमोर बसवून पैशाच्या देवाणघेवाणबद्दल विचारणा केली, तेव्हा मनीषाने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे भरण्यास भाग पडल्याचे काहींनी सांगितले आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्याप्रकरणी गृहकलह असल्याचे त्यांचे निकटवर्तीय खासगीत मान्य करतात. पण, पोलिसांनी त्या अंगाने तपास केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहरातील काही लोकांनी केली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने (Manisha Musale-Mane) हिला अटक करण्यात आली होती. त्या वेळी पहिल्यांदा पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनीच चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. ती करताना कोठडीचे अधिकार राखून ठेवले होते. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी घेतली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा न्यायालयीन कोठडीची शिक्षा तिला सुनावण्यात आली आहे.
यादरम्यान पोलिसांनी मनीषा आणि पाच साक्षीदारांना समोरासमोर बसवून पैशाच्या व्यवहाराबद्दल चौकशी केली. त्यातील काहींनी मनीषा हिने धमकी देऊन तिच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडल्याचे सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, त्याबाबत मनीषा काहाही बोलायला तयार नाही. त्याबाबत सखोल तपास करण्यासाठी पोलिस कोठडीचे हक्क राखून ठेवत पोलिसांनीच तिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे.
डॉक्टरांनी मनीषा मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासामुळेच आणि दिलेल्या धमकीमुळे आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे केला आहे. मात्र, डॉक्टरांचे निकटवर्तीय हे मान्य करायला तयार नाहीत. कोट्यवधींचा मालमत्ता असलेले वळसंगकर मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासामुळे आत्महत्या करतील, हे मान्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांच्या आत्महत्येमागे गृहकलह असल्याचा त्यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे, ते खासगीत याबाबत सांगतात. गृहकलहामागे कुटुंबातील जवळचीच व्यक्ती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण, पोलिस अजूनही त्या अंगाने चौकशी करायला तयार नसल्याचे आतापर्यंतच्या तपासून दिसून येत आहे. आम्हाला पुरावा द्या, त्यानंतर आम्ही तपास करतो, असा स्टॅंड पोलिसांचा आहे, त्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येची सीआयडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शहरातील काहींनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.