Solapur, 07 September : माढा तालुक्यातील कुडू गावात महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकावतानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठली असतानाच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. पण या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जोरदार टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना एका मध्यस्थी नेत्याने बाबा जगताप यांना कॉन्फरन्स कॉल जोडून दिला होता, असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला हेाता. तसेच त्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे, त्यांनी अपने खुद के गिरेबान में झांकना चाहिए. त्यांनी स्वतःकडे बघितलं पाहिजे की आपण नेमके काय करतोय, असा टोला त्यांनी लगावला.
मी जेव्हा पालकमंत्री झालो, तेव्हाच अवैध व्यवसाय चालू देणार नाही, ही भूमिका मांडली होती. त्या अनुषंगाने कुर्डू गावात परवा पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अद्याप कारवाई चालू आहे. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय 100 टक्के थांबले, असे मी म्हणणार नाही. पण, बहुतांश ठिकाणी त्यावर आळा घालण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यावर आम्हाला यशही आलं आहे. अजूनही काही ठिकाणी अशा पद्धतीने उपसा सुरू आहे, त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना मी दिलेल्या आहेत, असेही जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी स्पष्ट केले.
गोरे म्हणाले, एमपीडी कायद्यांतर्गत कधी नव्हे; एवढी मोठी कारवाई आपण केलेली आहे. आणखी काही लोकांवर ती कारवाई प्रस्तावित आहे आणि ती होईलही. अजितदादांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. त्याचे समर्थन कोणी करत नसलं तरी तो प्रकार गैरसमजातून झालेला आहे. या घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अवैध व्यवसायाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे. कुठल्या परिस्थितीमध्ये अशा अधिकाऱ्यांवर किंवा व्यवस्थेवर तसा दबाव येणार नाही आणि आला तरी प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभे आहेत. चांगलं काम करणाऱ्या, बेकायदेशीर कामाला आळा घालणाऱ्या, लोकाभिमुख काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या पाठीशी मी उभा आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
ओबीसींसाठी फडणवीसांनी खूप सोसलं
ओबीसी समाजाच्या हक्कासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जेवढे सोसलं आहे, ते अन्य कुणी सोसलं नाही. त्यांच्यावर झालेले शाब्दिक, वैचारिक आणि व्यक्तिगत हल्ले किंवा त्यांना आजपर्यंत केलं गेलेलं टार्गेट हे ओबीसीच्या हक्काचे रक्षण करताना केलं गेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजाच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही. यासाठी आश्वस्त केले आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
सर्वच बांधवांना माझी विनंती आहे की, सद्यपरिस्थितीमध्ये आपण जीआर बघावा. जीआरचे परिणाम बघावेत आणि त्यातून आपण स्वतःच मत बनवावे. अगदी सगळ्याचं म्हणजे ओबीसी समाजबांधव असेल किंवा मराठा समाज बांधव असतील त्यांना माझी विनंती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.