Sangli/Vasai News : दिवाळीच्या सणादरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली. वसई (जि. ठाणे) येथे सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) म्हणून कार्यरत असलेले तुकाराम उर्फ अजित पतंग मोटे (वय ४२, रा. देशिंग-बोरगाव रोड) यांचा उच्चदाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे हरोली गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर महावितरणच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित मोटे हे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त शनिवारी आपल्या गावी आले होते. हरोली गावाजवळील मळ्यातील घरात त्यांचे आई-वडील, भाऊ आणि इतर कुटुंबीय राहतात. वसई-विरार येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत असतानाही मोटे यांचा गावाशी नियमित संपर्क होता. गावी आल्यानंतर त्यांनी शनिवारी आणि रविवारी सकाळी मित्रमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घराजवळील ऊसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. शेतातून धुराचे लोट दिसताच अजित मोटे हे वडील आणि भावासह घटनास्थळी धावले. यावेळी शेतातील विद्युत खांबावरून तुटून खाली पडलेल्या विद्युतप्रवाहित तारेला त्यांचा स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने ते जागीच कोसळले.
ही घटना लक्षात येताच त्यांचे बंधू अमोल मोटे यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
अजित मोटे यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांना मोठा धक्का बसला. दिवाळीच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे हरोली गावावर शोककळा पसरली. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
दरम्यान, शेतात विद्युत खांबावरून तुटलेली प्रवाहित तार खाली पडून राहिल्याने हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. विद्युत तारांची देखभाल आणि सुरक्षिततेबाबत महावितरणने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.