Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'कास'ची पाईपलाइन हे उशिरा सूचलेले शहाणपण... शिवेंद्रसिंहराजेंची उदयनराजेंवर खोचक टीका

Umesh Bambare-Patil

सातारा : कास प्रकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर तातडीने वाढीव जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर करून घेणे आवश्यक होते. पण, केवळ पैसे खाण्यासाठी सत्ता मिळवणाऱ्यांना याचे भान राहिले नसावे. उशिरा का होईना शहाणपण सुचले हे सातारकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. पालिकेला लुटून खाणाऱ्यांचे 'ब्रीद' काय आहे, हे सातारकर जाणून आहेत, असा खोचक टोला साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला आहे.

हे कामे मंजूर केल्याबद्दल सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे शिवेंद्रसिंहराजे यांनी आभार मानले. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले. जनतेने पाच वर्षांसाठी पालिकेची सत्ता दिली, ती सातारा शहराचा विकास करण्यासाठी. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी. मात्र, सत्ताधाऱ्यांना नागरिकांशी काहीही देणेघेणे नाही. हे पालिकेत कमिशन, टेंडर आणि टक्केवारीसाठी लागणाऱ्या कळवंडी पाहून सातारकरांना समजलेच आहे.

आता निवडणूक जवळ आली की यांच्यातील 'कैवारी' नेहमीप्रमाणे झोपेतून जागा झाला आहे, हेही सातारकर ओळखून आहेत. डिसेंबर २०२१ मध्येच सातारा पालिकेची बॉडी बरखास्त झाली आणि पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यामुळे २४ जानेवारी २०२२ रोजी प्रशासक असलेले मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केंद्राच्या अमृत अभियानातून कास ते सातारा अतिरिक्त पाईपलाईनसाठी प्रस्ताव पाठवला आणि निधी मंजूर झाला. त्यामुळे यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे आभार मानले पाहिजेत.

पालिकेत आता तुमची सत्ता नाही, प्रशासक आहे याचे तरी भान ठेवा, असा टोला लागवत शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले की, ज्या पाईपलाईनच्या कामाची आता टिमकी वाजवताय हे काम तुमचे नाही, ते बापट यांच्यामुळे झाले आहे. खरे तर, कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरु झाल्यानंतर अतिरिक्त पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर करून घेतले असते. तर आज सातारकरांना कास धरणातील वाढीव आणि मुबलक पाणी मिळाले असते.

पण, तुमच्या नको त्या 'कार्यबाहुल्यामुळे' आणि नाकर्तेपणामुळे याचा तुम्हाला सोयीस्कर विसर पडला आणि सातारकरांना कास तुडुंब भरले असताना मुबलक पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सातारकरांच्या समस्या सोडवणे हे आपले कर्तव्यच आहे, मात्र तुम्ही कोणावर तरी उपकार केल्याचा आव आणताय, यातही काही नवल नाही. काम मंजूर असले तरी पूर्ण होण्यास आणखी वर्षभर काळ लोटणार आहे. त्यामुळे सातारकरांना अजूनही वाटच पहावी लागणार आहे. आज मंजूर झालेले काम हे दोन वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते, सातारकरांचे दुर्दैव दुसरे काय. परिक्षा झाली, निकालही लागला आणि आत्ता हे म्हणतात मी अभ्यास केलाय, अशी तऱ्हा पाहायला मिळत आहे.

मांजराच्या पाठीत काठी बसणार...

कोण काय काम करतंय, कोण पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटतय हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. सातारकर सर्वकाही उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. त्यामुळे मांजराला डोळे मिटून दुध पिणे लवकरच बाधक ठरेल. सातारकरांची काठी मांजराच्या पाठीत निश्चित बसेल, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी शेवटी नमुद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT