Kolhapur News : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यातील लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. महायुतीकडून मुश्रीफ तर महाविकास आघाडीकडून घाटगे यांची लढत तुल्यबळ होत असताना थोडा पुढच्या राजकारणाने महायुतीला घायाळ केले आहे.
महाविकास आघाडीकडून संजय घाटगे महायुतीच्या गोटात दाखल झाले आहेत. माजी खासदार संजय मंडलिक यांचा गट मुश्रीफ यांच्या पाठीशी उभा आहे. बलाढ्य महायुती असताना मुश्रीफ यांना आपला मतदारसंघ राखण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घ्यावे लागत आहे. गेली पाच टर्म आमदार, दोन वेळा कॅबिनेट मंत्री, विकास कामांचा डोंगर इतके भक्कम स्थिती असताना मुश्रीफ यांना कडवी झुंज द्यावी लागत आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी पालकमंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यातच खरी लढत होणार आहे.
दोघांमध्ये चुरशीची लढाई होत असताना कागलमधील विजयाची उमेद गडहिंग्लज व उत्तूर भागावर अवलंबून असणार आहे. या दोन्ही उमेदवारांचे ज्या भागात प्राबल्य असेल तोच उमेदवार विजयापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
सध्याच्या घडीला कागलच्या राजकारणात मोठे धक्के देण्यासाठी दोन्ही मातब्बर कामाला लागले आहेत. बँकेचे कारखान्याचे आणि जिल्हा परिषदेला इच्छुक असणारी कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू झाली आहे. त्यातूनच कागलची पुढील रणनीती ठरणार आहे.
कागलचा श्रावण बाळ म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची ओळख आहे. विकास कामाच्या जोरावरच ते निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. शिवाय मागील पाच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून निधी आणत यांनी देखील तयारी केली आहे. मात्र एनवेळी उमेदवारीची अडचण झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून घाटगे यांनी उमेदवारी मिळवली. कागलच्या या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर होणार हे निश्चित आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची या दोन्ही उमेदवारांनी भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.
दोन्ही गटांकडून एकमेकांचे कार्यकर्ते फोडले जाणार आहेत. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यावरच कागलच्या विजयाचे समीकरण अवलंबून आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांना थेट जनतेचा विरोध नसला तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांवर नागरिकांची नाराजी आहे. त्याशिवाय शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर मतदारसंघांमधील असलेली नाराजी मुश्रीफ यांनी थोडीफार कमी केली आहे. मात्र, मत रुपी ही नाराजी मुश्रीफ बदलणार कसे याचे मोठे आव्हान असणार आहे. (Kagal Assembly Election news)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.