Kolhapur News, 21 Nov : कागल नगरपालिकेच्या राजकारणाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. राज्यात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्याशी युती केली.
दोन कट्टर राजकीय विरोधक एकमेकांसोबत आल्यानं जिल्ह्याला नव्हे तर राज्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर महायुती म्हणून कागलच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या माजी खासदार संजय मंडलिक यांना एकाकी पाडून कागलच्या नगरपालिकेमध्ये घाटगे आणि मुश्रीफ यांनी युती केली आहे.
त्यामुळे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कागलचं राजकारण ढवळून निघालं आहे. कागलला राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. आजवर कागलच्या राजकारणाने एकमेकांचे शत्रुत्व आणि एकमेकांची मित्रता देखील पाहिली आहे. आजवरच्या इतिहासात दोन कट्टर राजकीय वैरी एकत्र आले आहेत. तर एकमेकांचे जिवलग मित्र राजकारणाने कट्टर वैरी बनवले आहेत. म्हणूनच आपल्या सोयीस्कर भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात कागल हे राजकीय केंद्रस्थान बनले आहे.
त्यामुळे संतापलेल्या खासदार संजय मंडलिक यांनी घाटगे आणि मुश्रीफ यांची युती कागलमधील प्रॉपर्टीवरील आरक्षण उठवण्यासाठी आणि एका नेत्याला ईडीतून सुटका होण्यासाठी केली असल्याचा खळबळजनक दावा केला. मांडलिकांचा आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनीमंडलिकांना निर्वाणीचा इशारा देत मंत्री मुश्रीफांनी घाटगे आणि मंडलिक यांच्या रक्तरंजित संघर्षातील त्या 10 खुनाचा विषय काढला.
कागलच राजकारण पाहिलं तर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या राजकारणापासून सुरू झालेला रक्तरंजित इतिहास तितकाच या राजकारणाला कारणीभूत आहे. दोघांची मैत्री झाली असली तरी तत्कालीन राजकीय काळात गटातटाचं राजकारण उफाळून आलं होतं. याच गटातटाच्या राजकारणाने तालुक्याने खून, मारामारी,दगडफेक, जाळपोळ पाहिली आहे.
कागलच्या राजकारणावर पकड करायची झाल्यास साखर कारखाना उभा करायला हवा हे राज्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर कागल शेजारील असलेल्या माळावर शाहू कारखाना उभा केला. पाठोपाठ स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी हमीदवाडा साखर कारखाना सुरु केला. यातूनच त्यांचे राजकीय प्रस्त वाढायला सुरुवात झाली. गावपातळीच्या निवडणुकीवरून थेट जिल्हा परिषद निवडणूक लढवत अनेकांचे राजकारण विधानसभेपर्यंत गेले. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक हे 1972 च्या काळात आमदार होते.
त्यांना पराभूत करून विक्रमसिंह घाटगे 1978 आणि 1980 ला आमदार झाले. मात्र मंडलिक विरुद्ध घाटगे या संघर्ष इतका उफाळला की गावागावात दोन गट तयार झाले. प्रत्येक गावात दोन गटाचे शाळकरी मुले सुद्धा शाळेत बसताना घाटगे आणि मंडलिक असे गटतट करून बसताना दिसली. इतकंच नव्हे तर नदीला धुणे धुण्यासाठी ठेवलेल्या दगडांवर गटातटाचा प्रभाव होता. या सर्व गटातटाच्या राजकारणात बिद्री, बोरवडे, सावर्डे दुमाला, फराकटेवाडी, बेलवळे, सेनापती कापसी, मळगे खुर्द, यासह कागल तालुक्याच्या पश्चिम भागात अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली.
अगदी अलीकडच्या 2013 काळात गटातटाच्या राजकारणामुळे खून पडले होते. वंदूर, कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, बाचणी गावात मारामारी होऊन अनेकांनी हातपाय गमावलं. पण हा संघर्ष केवळ दोन गटापुरता नव्हता तर सर्व गटातटाचे राजकारण याला कारणीभूत होते. काहीवेळा पोटनिवडणुकीत विजयी मिरवणूकवर ऍसिड हल्ले झाले होते. त्यात राष्ट्रीय खेळाडूंला फटका बसला होता.
इतका टोकाचा संघर्ष पाहून आज ही कागलचे जनता या सर्व राजकीय नेत्यांसोबत आहे. अनेक जुनेजाणते नागरिक या राजकारणा विषयावर जास्त बोलत नाहीत. पण कागलच्या राजकारणात इतका टोकाचा संघर्ष होत असताना नेत्यांची भूमिका सोईस्कर राहिली आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री मुश्रीफ एकत्र असताना त्यांच्या विरोधात दिवंगत विक्रमसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे यांनी आघाडी केली होती.
तर मंत्री मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर माजी आमदार संजय घाटगे आणि मंडलिक हे एकत्र आले होते. तर याच राजकारणात कधी राजेगट घाटगे आणि मंडलिक गट देखील हे देखील एकत्र पाहायला मिळाले. आज घाडगे आणि मुश्रीफ एकत्र आल्यानंतर मंडलिक यांचा संताप अनावर होताना दिसत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री मुश्रीफ यांच्याकडून चोख प्रतिउत्तर दिले जात आहे. मात्र आगामी भडकत्या राजकारणामुळे पुन्हा एकदा कागल तालुक्यात ही परिस्थिती निर्माण होण्याकडे वाटचाल सुरू आहे की काय? अशी भीती कागलकरांना आहे.
माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, दोघांच्या युतीचे कारण हे कोणत्याही विकास कामाचा मुद्दा नाही. एका नेत्याची प्रॉपर्टी अडकलेली आहे. आणि दुसऱ्या नेता हा ईडीमध्ये अडकलेला आहे. कागलमधील जुन्या वाड्यावरील आरक्षण एका नेत्याला उठवायचे आहे. तर एका नेत्याला ईडी मधून मुक्तता हवी आहे. यातून सुटका होण्यासाठीच घाटगे आणि मुश्रीफ यांनी युती केली असल्याचा गौप्यस्फ़ोट मंडलिक यांनी केला.
मंडलिक यांच्या आरोपाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी, स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या संघर्षाच्या काळात जवळपास दहा खून पडले होते. अनेकांची डोकी फुटली होती. मात्र जनतेने आम्हाला विकास करण्यासाठी निवडून दिला आहे. मी तोंड उघडलं तर बात दूर दूर तक जायेगी. त्यामुळे त्यांनी स्वतःला आवरावं असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी मंडलिक यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.