Janshakti Aghadi leaders join BJP in Karad city under MLA Dr. Atul Bhosale’s leadership, altering local political equations. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP News : अख्ख्या पक्षाचाच भाजपमध्ये प्रवेश; मेगा भरतीने काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हादरे

BJP News : कराड शहरातील जनशक्ती आघाडीने आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये प्रवेश केला असून, या घडामोडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Hrishikesh Nalagune

BJP News : कराड शहराच्या राजकारणावर मोठे प्रभुत्व असलेल्या जनशक्ती आघाडीने अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा भाजपप्रवेश काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का ठरला आहे. भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पुढाकाराने जनशक्तीच्या दोन माजी नगराध्यक्षांसह सहा माजी नगरसेवक भाजपवासी झाले. त्यामुळे कऱ्हाड पालिकेच्या राजकारणात भूकंप झाल्याची चर्चा आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ. भोसले, पक्षाचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव आणि शहरातील अनेक पदाधिकारी व जनशक्ती आघाडीचे समर्थक उपस्थित होते.

जनशक्ती आघाडी दिवाळीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबतची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. आमदार भोसले यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अरुण जाधव, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव यांची भेट घेतली होती. त्यानंतर कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांनीही त्यांची भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता.

जनशक्ती आघाडी 25 वर्षांनंतर संपुष्टात :

कराड नगरपालिकेच्या 2001 मधील सार्वत्रिक निवडणुकीत जनशक्ती आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर जाधव गट सत्तेत आला. तेव्हापासून जाधव गट पालिकेच्या राजकारणात सक्रिय आहे. अध्यक्ष अरुण जाधव यांनी 2004 मध्ये कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या ताकदीवर निवडणूक देखील लढवली. त्यावेळी त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला.

मतदारसंघ पुनर्रचनेत कऱ्हाड शहराचा समावेश कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झाला. त्या वेळी 2009 मध्ये ज्येष्ठ नेते (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांना जनशक्तीने साथ दिली. त्यानंतर 2014, 2019 व 2024च्या विधानसभेत जनशक्तीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साथ दिली. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादी म्हणजेच, महाविकास आघाडीचाच प्रचार केला.

आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह महाविकास आघाडीशीही अरुण जाधव यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे जाधव गटाचा भाजप प्रवेश महाविकास आघाडीसह काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का मानला जात आहे. पण निकालानंतरच हा धक्का किती मोठा होता? जाधव यांच्या प्रवेशाचा भाजपला काय फायदा झाला? गोष्टी कळणार आहेत.

लोकशाही आघाडीलाही धक्का :

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडीचे नेते शिवाजी पवार यांनीही भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह पवार यांचा भाजप प्रवेश लोकशाहीलाही धक्का देणारा आहे.पवार यांनी जिल्हा नियोजन समितीवर काम केले आहे. त्यासह त्यांच्या पत्नी लोकशाही आघाडीच्या माजी नगरसेविका आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT