Atul Bhosale-Manoj Ghorpade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politic's : भाजपच्या दोन आमदारांनी सभापती अन्‌ उपसभापतिपद वाटून घेतले; पण अतुल भोसलेंपुढे वेगळा पेच

Karad Panchayat Samiti Sabhapati : कऱ्हाड पंचायत समितीत भाजपने 13 सदस्य निवडून इतिहास घडवला. सभापतिपद कऱ्हाड दक्षिणमधील महिलेला मिळणार असून नंदाताई यादव आणि वर्षा निकम यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 14 March : कऱ्हाड पंचायत समितीत पहिल्यांदाच भाजपने 13 सदस्य निवडून आणून इतिहास घडवला. त्यात कऱ्हाड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील आठ, तर कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे पाच सदस्य निवडून आले आहेत.

कऱ्हाड दक्षिणमधील (Karad South) भाजपकडून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने सभापतिपदी दक्षिणमधीलच महिलेला संधी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे विंग गणातून निवडून आलेल्या नंदाताई यादव आणि शेरे गणातील वर्षा निकम यापैकी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता तालुक्याला लागली आहे. कऱ्हाड उत्तरला उपसभापतिपद मिळणार आहे. त्यामुळे उपसभापतिपदी कोणाची लॉटरी लागणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे १२ गट आणि पंचायत समितीच्या २४ गणांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. तालुक्यात पहिल्यांदाच भाजपला १२ पैकी आठ गटांत, तर पंचायत समितीच्या २४ पैकी १३ गणांत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे पंचायत समितीवर () भाजपने पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडवून एकहाती सत्ता काबीज केली आहे.

भाजपच्या धैर्यजा माने-चरेगाव, कोमल यादव-वडोली भिकेश्वर, डॉ. संतोष पाटील-मसूर, अनिता वेताळ-वाघेरी, प्रियांका पळसे-हजारमाची, माधवी पाटसुपे-सैदापूर, नरेंद्र नांगरे-पाटील-कोयना वसाहत, अर्जुन कराळे-कोळे, नंदाताई यादव-विंग, दादासाहेब मरगळे-गोळेश्वर, वर्षा निकम-शेरे, धनंजय पाटील-रेठरे बुद्रुक, गोविंद गावडे-काले हे सदस्य निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप चव्हाण-पाल, संगीता चव्हाण-उंब्रज, सिद्धार्थ चव्हाण-कोपर्डे हवेली हे तीन, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पूजा काटवटे-कार्वे, स्वाती थोरात-कालवडे, नितीन थोरात-सवादे, वृषाली पाटील-येळगाव हे चार, शिवसेना शिंदे गटाचे जयश्री पाटील -सुपने व दिनेश कुंभार-तांबवे हे दोन आणि काँग्रेसचे संग्राम पवार-तळबीड व रवींद्र बडेकर-वारुंजी हे दोन सदस्य निवडून आले आहेत.

या वेळी कऱ्हाड दक्षिणमधून भाजपच्या आठ, तर उत्तरमधून पाच जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सभापतिपदी कऱ्हाड दक्षिण भाजपचा दावा आहे. पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातून कऱ्हाड दक्षिणमधील विंग गणातून नंदाताई यादव आणि शेरे गणातून वर्षा निकम या निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यातील कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कऱ्हाड उत्तरला या वेळी उपसभापतिपद मिळणार आहे. उपसभापतिपदावर भाजपकडून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कऱ्हाड उत्तरमधील धैर्यजा माने, कोमल यादव, डॉ. संतोष पाटील, अनिता वेताळ आणि प्रियांका पळसे हे पाच सदस्य आहेत. त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात उपसभापतिपदाची माळ पडणार याची तालुक्यात उत्सुकता आहे. सभापती आणि उपसभापतिपदी दोन्ही महिलांनाच संधी मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे लॉबिंग सुरू केले आहे.

पहिल्यांदा कोणाला संधी?

कराड तालुक्यातील कृष्णा कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सत्ताधारी भोसले गट आणि विरोधी गटाकडूनही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच सोमवारी (ता.१६ मार्च) येथील तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापतींची निवड होणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र, नेत्यांसमोर पहिल्यांदा संधी कोणाला द्यायची याचा पेच आहे.

विंग आणि शेरे हे दोन्ही गण कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रात आहेत. कृष्णा कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणालाही नाराज न करता मध्यममार्ग काढण्यासाठी आमदार डॉ. भोसले यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगानेच सभापतिपद देण्यात येणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT