Karnataka CM Oath Ceremony : siddaramaiah Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Siddaramaiah Maharashtra Visit: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; 'हे' आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Sangli Politics : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. सांगलीमध्ये काँग्रेसच्या महानिर्धार मेळाव्यात त्यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. कर्नाटकातील अभूतपूर्व विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर त्यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विश्वजीत कदम, बाळासाहेब थोरात, राज्यातील इतर पदाधिकारी आणि काँग्रेस नेते या कार्यक्रमाला उपस्थित होणार आहेत. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार आणि सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेला चेहरा आता काँग्रेस महाराष्ट्रामध्येही वापरण्याच्या तयारीत आहे. सांगली शहरातील राजमती मैदानावर माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांच्या नेतृत्वाखाली हा महानिर्धार मेळावा संपन्न होणार आहे. यानिमित्तानं काँग्रेसकडून आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. (Maharashtra Politics)

काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे. सांगलीत जे पिकतं ते महाराष्ट्रात पसरतं. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची जोमाने सुरुवात करण्याचा आणि वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल. या सत्काराच्या निमित्तानं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सांगली शहरातून जंगी रॅलीदेखील काढण्यात येणार आहे.

गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली. विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली होती. यात त्यांना दोन नंबरची मतं मिळाली. आता मात्र लोकसभेची ही जागा काँग्रेसकडे राहावी यासाठी काँग्रेसने (Congress) कंबर कसली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचीही सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभेवर नजर आहे. मात्र सांगली लोकसभेची जागा काँग्रेसचीच असून ती कोणत्याही एका विशिष्ट गटाची नाही, तर पूर्णपणे पक्षाची जागा आहे, असेही विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. तर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. पण लोकसभा किंवा विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीतच निर्णय होईल, असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका घेतली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT