Kolhapur Assembly Election News : करवीर विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीची लढत जवळपास निश्चित झाली आहे. आघाडीकडून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील तर महायुतीकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यातच प्रमुख लढत होणार आहे.
नरके आणि पाटील गटाकडून सध्या गाव पातळीवर पदयात्रा प्रचार दौरे काढत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या अपक्षांनी महिलांचे विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. महायुतीमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्षाने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे अपक्ष महायुतीला या मतदारसंघात पोखरण्याच्या तयारीत आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस कडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना संभाव्य उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरी लढत या दोघांमध्ये होणार असल्याचे चित्र आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी या मतदारसंघावर दावा केल्यानंतर त्यांच्याकडून विजन चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे हे उमेदवार आहेत. त्यांची बंडखोरी निश्चित मानली जाते. महायुतीमध्ये या दोन पक्षाने या जागेवर दावा केला असला तरी उमेदवारी कोणाला मिळणार यावर बरेच अवलंबून आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ही उमेदवारी जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र घोरपडे यांची बंडखोरी निश्चित मानली जाते. त्यांनी महायुतीच पोखरण्याचे नियोजन सुरू केले आहे. काँग्रेसपेक्षा पन्हाळा तालुक्यातील जनसुराज्याची मते मिळवण्यासाठी नरके यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तर उर्वरित करवीर विधानसभा मतदारसंघात पाटील आणि नरके यांच्यातच प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत.
राधानगरी भुदरगड गारगोटी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच धामणी धरणाची घळभरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित केली. या सोहळ्याला करवीर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेला इच्छुक असणारे राहुल पाटील उपस्थित होते. मात्र माजी आमदार चंद्रदीप नरके उपस्थित नव्हते. यामुळे करवीर आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातील अपेक्षित राजकारणाच्या चर्चा समाजमाध्यमांवर उमटायला सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.