Solapur, 09 August : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड दौऱ्यातील पत्रकार परिषद माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला थांबवून आटोपती घेतली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ असे संबोधून टीका केली. त्यावरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले. त्या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनेत्रा पवार यांना खासदार सुनील तटकरेंसंदर्भात एक मोलाचा सल्ला दिला आहे, त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
संपर्कप्रमुख म्हणून सुषमा अंधारे शनिवारपासून (ता. ०८ ऑगस्ट) सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेत आहेत. त्यासंदर्भात सोलापुरात पत्रकार परिषद झाली. त्यात बोलताना अंधारे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हा सल्ला दिला आहे.
त्या म्हणाल्या, गुंगी गुडिया अशी टीका इंदिरा गांधी यांच्यावर पहिल्यांदा झाली होती, त्याला त्यांनी कामातून उत्तर दिलं होतं. बांगलादेश निर्मिती, अणुचाचणी, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा दहापट अधिक ताकदीने काम इंदिरा गांधी यांनी केलं आहे.
इंदिरा गांधी यांच्या पद्धतीने सुनेत्रा वाहिनी कामगिरी करू शकतील का?, यासाठी आपण थोडा काळ वाट बघू या. त्यांच्याबाबत घाईघाईने जजमेन्टल होण्याची गरज नाही. सुनेत्रावहिनींना काम करण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही अंधारे म्हणाल्या.
सुनेत्रा वहिनींनी बीडसंदर्भाने (मी स्वतःला बीडची लेक मानते, त्यामुळे मला बीडची सर्व परिस्थिती माहिती आहे) निर्णय घेताना खूप कठोरपणे भूमिका घ्यावी लागेल. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून किमान बीडबाबतचे निर्णय घेताना तरी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना बाजूला ठेवा. कारण तटकरे हे कटकरेंच्या भूमिकेत जास्त जात आहेत का, याचा विचार सुनेत्रावहिनींनी केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
महायुतीत नव्हे भाजपमध्ये मिठाचा खडा
महायुतीत नव्हे तर भाजपमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे. कारण चंद्रकांत पाटील यांना ठरवून गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या अर्थ खात्यावर भाजप कुंडली मारून बसलीय, हे भयंकर आहे. जो मेरा है, वो मेरा है और जो तेरा है वोभी मेरा है, असं सध्या भाजपचं धोरण आहे. या सर्वांत एकनाथ शिंदे हे वाजत्री म्हणून आहेत, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
असल्यावर मला बोलायचं नाही : सुषमा अंधारे
खासदार ज्योती वाघमारे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अंधारे यांनी जरा काही तरी दर्जा राखा, असल्यावर मला बोलायचं नाही, असे सांगून अधिक बोलणं टाळलं. तसेच, शिंदे हे आगामी काळात ऑस्ट्रेलिया टोरंटोतही महाशिबीर घेतील, असेही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.