Sangali News : आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे खानापुरात निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभेनंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. मात्र, खानापुरात पुढचा आमदार भाजपचा असेल, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वारंवार जाहीर भाषणातून सांगितले होते. त्यांचा हा रोख अनिल बाबर यांच्याकडे राहिला, पण अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. त्यांच्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत पडळकर यांची भूमिका काय? याची चर्चा सुरू झाली आहे.
शिंदे गट शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे 31 जानेवारीला निधन झाले. त्यांच्या रिक्त जागेसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगास खानापूर पोटनिवडणुकीबाबतची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने कळवली आहे. त्यामुळे लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
खानापूर मतदारसंघात दोन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून खानापूर व आटपाडीमधील नेत्यांमध्ये राजकीय वाद उफाळून आला होता. त्याचे पडसाद पोटनिवडणुकीत उमटणार काय, अशी कुजबूज सुरू झाली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. सिंचन योजनासह विकासकामे मार्गी लावण्यात बाबर यांचा हातखंडा होता. दोन्ही तालुक्यांचा सखोल अभ्यास असल्याने कामामध्ये तडजोड केली जात नव्हती. त्यातच आटपाडी तालुक्यातील भाजप नेते गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. त्यामुळे मतदारसंघातील विकासावरून स्वर्गीय आमदार बाबर आणि पडळकर यांच्यात अनेक वेळा शाब्दिक चकमक उडाली होती.
आमदार पडळकर यांच्याकडून वारंवार आमदार बाबर यांना टार्गेट केले जात होते. भाजप आणि शिंदे गट शिवसेनेची युती असली तरी 2024 आमदार भाजपचा असेल असे जाहीरपणे भाषणातून सांगत होते. संधी मिळेल तिथे बाबर यांना लक्ष्य केले जात असल्याने दोन्ही नेत्यांमधील वाद टोकाला गेला होता. आटपाडीतील बाबर यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्यावरही पडळकर यांनी आरोप करीत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आटपाडीमध्ये बाबर-पाटील विरुद्ध पडळकर-देशमुख अशी राजकीय समीकरण होते. मात्र, आमदार बाबर यांच्या निधनाने चित्र बदलले आहे.
बाबर यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीत बाबर कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे चिरंजीव सुहास यांना महायुतीकडून पुढे आणले जाण्याचाही शक्यता आहे. अनिल बाबर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे कट्टर समर्थक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ट संबंध होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीत सामील झालेले राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशीही बाबर यांचा घरोबा होता, त्यामुळे महायुतीतील पक्षांचा बाबर कुटुंबास हिरवा कंदील आहे. मात्र, भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) ही कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
अनिल बाबर यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात निवडणूक जाहीर झालेली नाही. जर निवडणूक लागलीच तर भाजप नेत्यांकडून जे आदेश येतील, ते आम्ही पाळू, असे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती परमानंद पडळकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.
R