Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे राजकारण हे सर्व काही योगायोगाने होत आहे, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली असली तरी 'सबकुछ कागल' याचा पहिला राजकीय बळी मंत्री मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयाचा पडला आहे. कोल्हापूर शेती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी तडका फडका राजीनामा दिला आहे. कागल तालुक्यातील आणि खास करून राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदाला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नाहक तक्रारी होत असल्याचा दाखलाच सूर्यकांत पाटील यांनी देत आपल्या पदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे. जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यासोबत विविध सेवा संस्थेच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. माझ्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नसतानाही मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत माझ्याविषयी काहींनी नाहक तक्रारी केल्या. त्यामुळे मी नाराज होऊन राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच सदस्य आहेत. जनसुराज्य, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व अपक्ष संचालकांपैकी काहींनी पाटील यांनी घेतलेल्या काही निर्णयाला विरोध दर्शवला. यावरून संचालक मंडळातच धुसफूस सुरू होती. यातून मुश्रीफ यांच्यापर्यंत काही तक्रारी गेल्या. त्यांनी पाटील यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्ष राजीनामा देण्याची सूचना केली होती.
त्यानंतर पाटील यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन मी समितीमध्ये महसूल वाढीसाठी चांगले प्रयत्न केले. शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यातून नाराज घटकांनी माझ्याविरोधात मंत्र्यांपर्यंत तक्रारी पोहोचवल्या. मुश्रीफ यांनीही त्याची शहानिशा न करता दखल घेतली याचे दुख वाटते. त्यामुळे मी राजीनामा देत राजकीय संन्यास घेणार आहे, असे सांगितले होते.
संचालकांकडे अप्रत्यक्ष ठेका समितीतील रस्ते कामाचा ठेका वादग्रस्त ठरला. यात काही संचालकांनीच अप्रत्यक्षरीत्या या कामाचा ठेका घेतला. यात अजित पवार गटाचे माझ्यासह कोणीही नाही, असे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, "शाहू सांस्कृतिक मंदिर सभागृह 'बांधा-वापरा- हस्तांतरित करा' या तत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यातून समितीला दरमहा सहा लाख रुपयांचे भाडे येणार होते. मात्र, त्यालाही काही संचालकांनी विरोध केला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतीस वंदन करून आजचा दिवस मी राजकीय जीवनातून बाहेर पडण्यासाठी निवडला व आजच दुपारी जिल्हा सहकार उपनिबंधकांकडे सभापतिपदाचा राजीनामा दिला."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.