Devendra Fadnavis-chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात भाजप मोठे मन दाखविणार कि महापालिकेची रंगीत तालिम घेणार?

Kolhapur bypoll : गोकूळ, जिल्हा बॅंक, विधान परिषदेनंतर आता या निवडणुकीसाठी कोल्हापूरातील नेत्यांना डोके चालवावे लागणार आहे.

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या मार्चमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने देखील तयारी सुरु केली असून, मतदानासाठी सोलापूर जिल्ह्यातून ईव्हीएम मशीन्स मागविण्यात आली आहेत. यासह इतर साहित्याची मागणी करण्याचे तसेच आवश्यक कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्याचे पत्र जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दिले आहे.

'कोल्हापूर उत्तर'चे आमदार चंद्रकांत जाधव यांचे मागील महिन्यात १ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती. मात्र कोणत्याही जागेवर ६ महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते, त्यामुळे ५ राज्यांसोबतच कोल्हापूर उत्तरचीही निवडणूक घोषित होईल असा होरा होता. मात्र, या कार्यक्रमात ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीची कोणतीही घोषणा झाली नाही. हि गोष्ट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्यानुसार आता ५ राज्यांच्या निवडणूक कालावधीतच कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे मतदानापुर्वी ४५ दिवस आधी निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तयारी सुरु करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदारसंघासाठी आवश्यक २ हजार ५०० ईव्हीएम सोलापूर जिल्ह्यातून उपलब्ध करून घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणुकीसाठी एबी फॉर्म, बोटाला लावायची शाई अशा आवश्यक साहित्याची मागणी करा, असेही पत्र मंगळवारी देण्यात आले आहे.

दरम्यान रिक्त झालेली जागा ही काँग्रेसकडील होती, त्यामुळे काँग्रेसकडून दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी व माजी नगरसेविका जयश्री जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी तयारीलाही सुरुवात केली आहे. पण आमदार जाधव यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे काँग्रेसचे आवाहन आहे. जिल्ह्याच्या भाजपमध्ये देखील निवडणूक लढवायची नाही असा मतप्रवाह आहे; परंतु भाजपच्या वरिष्ठ पातळीवर मात्र ही निवडणूक लढवावी असा आग्रह असल्याची माहिती आहे. कारण कोल्हापुरात महापालिकेच्या निवडणुकाही लवकरच होणार आहेत आणि ही पोटनिवडणूक म्हणजे त्याचीच पूर्वतयारी म्हणून पाहावे, असा सुर पक्षातून आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT