Kolhapur News: कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये गेली अनेक वर्षांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे एक भ्रष्ट रॅकेट दलालांमार्फत सुरू आहे. या माध्यमातून संबंधित अधिकारी, कर्मचारी व दलाल सावज शोधून कोट्यवधी रुपयांची माया जमवत आहेत, अशा या नालायक आणि भ्रष्ट साखळीमुळे खरे दिव्यांग लाभार्थी यांचे फार मोठ्याा प्रमाणात नुकसान होत आहे.
अनेक सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक अशा बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर नोकरी, बढती, व बदली इत्यादी कारणांसाठी उपयोग करत असून सरकारची फार मोठ्या प्रमाणात फसवणूकच करीत आहेत. जवळपास शेकडो प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी भांडाफोड केला आहे. त्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी, शिक्षक, यांना घरचा रस्ता धरावा लागणार आहे.
काही वरिष्ठ डॉक्टरांनी सुद्धा या साखळीमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करून अमाप पैसा मिळवल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी सार्वजनिक आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे संजय पवार यांनी केली.
एका व्यक्तीची शस्त्रक्रिया छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये झाल्याचे व केल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन जिल्हा शैल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख व त्यांच्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिल्याचे व त्याचबरोबर वरील शस्त्रक्रिया या रुग्णालयात झालीच नाही. अशा पद्धतीचे दुसरे पत्र व बोगस डिस्चार्ज कार्ड असल्याचे पुरावे आपल्या समोर सादर करीत आहोत. त्याचप्रमाणे 356 शिक्षकांची प्रमाणपत्रे सी. पी. आर प्रशासनाने त्याचा अहवाल द्यावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी. ई. ओ ) जिल्हा परिषद यांनी सांगितले होते. सी.पी.आरमध्ये तपासणी झाली असता हीच प्रमाणपत्रे हायर सेंटर यांच्याकडे रेफर करण्याचे कारण काय? याचा अर्थ पूर्वी दिलेले 10 दिव्यांग प्रमाणपत्रे चुकीचे आहेत, हे सिद्ध होत आहे.
कोणताही शासन निर्णयामध्ये असा उल्लेख नाही. की यांची दिव्यांग प्रमाणपत्र हायर सेंटरकडे रेफर करावीत. वरील सर्व प्रकार हे अत्यंत गंभीर असून पैशांच्या हव्यासापोटी खऱ्या अपंग लाभाथ्र्यांवर अन्याय व पदाचा दुरुपयोग करून जर का वरिष्ठ डॉक्टर यांनी सरकारची फसवणूक करणार असतील तर त्यांना तातडीने निलंबित करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत. या सर्व डॉक्टरांच्या कारकीर्दीमध्ये दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश सरकारने द्यावेत.
संबंधित विभागाचे अधिष्ठता व उपसंचालक यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्याकडे संबंधित सर्व डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करणे संदर्भात तातडीने प्रस्ताव पाठवावेत. अधिष्ठाता व उपसंचालक आपण या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी ही विनंती, अन्यथा आम्हाला आपल्याविरोधात सरकारकडे किंवा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे जे खरोखरच दिव्यांग आहेत. त्यांना मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी फरफट करावी लागते. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दवाखान्याचे आणि संबंधित डॉक्टरांचे उंबरे झिजवावे लागतात. अनेकांना पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करून देखील ही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे खरे दिव्यांग बांधवांना अजूनही वंचित व्हावे लागते, असे मत ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.