Solapur, 16 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज अपात्र ठरलेल्या सहा माजी संचालकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी आज (ता. १६ नोव्हेंबर) फेटाळून लावली आहे. या याचिकेचा निवाडा थोड्याच वेळात मिळणार आहे. उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेवर आजच्या आजच सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी माजी संचालकांनी आवश्यक ती संपूर्ण तयारीही केली आहे.
माजी संचालक रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे आणि सुरेश हसापुरे या सहा माजी संचालकांनी ॲड. गिरीश गोडबोले आणि ॲड. अभिजित कुलकर्णी यांच्या माध्यमातून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे.
या याचिकेवर शुक्रवारी (ता. १३ नोव्हेंबर) सुनावणी झाली होती. त्याचा निर्णय कोल्हापूर सर्किट बेंचने आज (ता. १६ नोव्हेंबर) दिला आहे. या याचिकेत सरकारच्या वतीने ॲड. तेजस कापरे, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने ॲड. ऋतुराज पवार आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ॲड. भूषणकुमार वाळिंबे यांनी काम पाहिले.
सहकार कायदा कलम ८८ आणि ११० अनुसार झालेल्या कारवाईमुळे माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी अपात्र ठरविले होते. त्यांच्या या निर्णयावर माजी संचालकांनी विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे अपिल केले होते, त्या ठिकाणीही त्यांचे उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात आले.
विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात माजी संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती. दोन्ही बाजूंकडून तब्बल ४ तासांपेक्षा अधिकचा काळ युक्तिवाद रंगला होता. न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी शुक्रवारी (ता. १३ नोव्हेंबर) दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले होते. मात्र, त्याचा निवाडा जाहीर केला नव्हता. मात्र, आज त्याचा निवाडा कोल्हापूर सर्किट बेंचने जाहीर केला आहे.
या निवाड्यामध्ये माजी सहा संचालकांचे अपिल कोर्टाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता माजी संचालकांपुढे सर्वोच्च न्यायालयात जाणे, हाच शेवटचा पर्याय राहिला आहे. त्या ठिकाणी माजी संचालकांनी धाव घेण्याचा निर्णय झाला आहे. दिल्लीतील बड्या वकिलाशी त्यांचे बोलणेही झाले आहे.
बँकेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारी (ता. १७ नोव्हेंबर) दुपारी ३ पर्यंतची मुदत असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात माजी संचालकांनी धाव घेतल्यानंतर या याचिकेवर कधी सुनावणी होणार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा काही परिणाम बँकेच्या निवडणुकीवर होणार का? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बँकेच्या राजकारणात आजचा (सोमवार, ता. १६ नोव्हेंबर) आणि उद्याचा (मंगळवार, ता. १७ नोव्हेंबर) दिवस महत्वाचा असणार आहे. या दोन दिवसात प्रचंड मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेच्या निवडणुकीची रणनीती कशी ठरते, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.