Kolhapur DCC Bank  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur KDCC Bank : कोल्हापुरात मोठा राजकीय भूकंप! जिल्हा बँकेचा 484 संस्थाना दणका! मतदानाचा हक्क हिरावला; बड्या नेत्यांचे वर्चस्व धोक्यात?

Kolhapur KDCC Bank defaulters voting rights : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 484 संस्थांवर थकबाकीमुळे कारवाई करण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार हिरावला जाण्याने आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Rahul Gadkar

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीतील सुमारे ४८४ संस्था थकबाकीमुळे मतदानासाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक ४५९ विकास सोसायट्यांचा समावेश आहे, तर अन्य २५ संस्थाही अपात्र ठरणार आहेत. दरम्यान, थकबाकीदार विकास सोसायट्यांचे ठराव पूर्वी त्या संस्थेचे संचालक किंवा गावातील नेते, जिल्हा पातळीवर लोकप्रतिनिधी यांच्या नावांवर होत होते.

पण, आता थकबाकीदार असलेल्या अशा संस्थांचे ठराव त्या संस्थेच्या सभासदांच्या नावे करावे लागतील. परिणामी, असे ठराव आपल्याच संबंधित व्यक्तीच्या नावे करण्यासाठी नेते सरसावले आहेत.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांची मुदत पाच जानेवारी २०२७ रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी जिल्हा बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे.

त्यानुसार ११ ऑगस्टपासून ठराव प्रक्रियेला सुरुवात झाली. नऊ सप्टेंबर हा ठराव दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर आलेल्या ठरावांवरून बँकेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवल्या जातील. जिल्हा बँकेने बँकेच्या पात्र सभासदांची यादी विभागीय सहनिबंध कार्यालयाकडे दिली आहे. त्यातून थकबाकीदार संस्थांची यादी स्वतंत्र केली.

त्यात ४५९ विकास सोसायट्या थकबाकीत असल्याचे पुढे आले. याशिवाय अन्य संस्थांपैकी २५ संस्थांही थकबाकीत आहेत. नव्या सहकार कायद्यानुसार विकास सोसायटी वगळता अन्य संस्था जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असतील, तर त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. यात विकास सोसायट्यांचा अपवाद असून, थकबाकीदार विकास सोसायटीचा ठराव आता त्या संस्थेच्या सभासदांच्या नावे करावा लागणार आहे.

विकास सोसायटी महत्त्वाचा गट असुन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक असलेले बहुंताशी आमदार हे विकास सोसायटी गटातून बँकेवर निवडून येतात. त्यामुळे हा गट महत्त्वाचा समजला जातो. त्यातून बँकेचे संचालक, त्यांचे कुटुंबीय यांच्याच नावे सर्वाधिक ठराव केले जातात. पण, आता थकबाकीदार विकास सोसायट्यांचे ठराव अशा नेते किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे करता येणार नाहीत. अशा संस्थांचे ठराव आपल्याला मानणाऱ्या त्या संस्थेच्या सभासदांच्या नावावर करण्यासाठी नेते सरसावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT