Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha Constituency Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: निवडणूक झाली आता गाठीभेटींवर जोर, उमेदवार आभारासाठी पुन्हा मतदारसंघात

Rahul Gadkar

Kolhapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसापूर्वी पार पडले. गेल्या महिनाभरापासून पायाला भिंगरी बांधून फिरत असलेले उमेदवार मतदानानंतरही विश्रांतीच्या भूमिकेत नसल्याचं दिसत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांचे (Kolhapur Lok Sabha Constituency) आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, (Shahu Maharaj Chhatrapati and Sanjay Mandalik) तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख तीन उमेदवार महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे काही विश्रांतीच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे.

कारण मतदान (Voting) पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणेच या सर्व उमेदवारांनी पसंत केले आहे. गावागावातला आढावा घेण्याचे काम या उमेदवारांकडून सुरू आहे. शिवाय प्रत्येक उमेदवाराकडून विजय आपलाच असल्याचा दावा ठामपणे केला जात आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील ३० दिवसांच्या प्रचाराची धावपळ संपली. यानंतर उमेदवारांनी आपली दैनंदिन कामे सुरू केली असून आज तरुण मंडळांनी साजरी केलेल्या शिवजयंती सोहळ्याला भेटी देण्याचे काम सकाळपासूनच सुरू केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काल दिवसभर आढावा घेण्याचे काम उमेदवारांकडून प्रत्येकांच्या घरी सुरू होते. अध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांनी उमेदवारांच्या भेटी घेऊन आपापल्या गावातील आढावा दिला आहे. सकाळपासूनच उमेदवारांच्या घरात कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या होत्या. शिवाय पुढील जोडण्यांसाठी कार्यकर्ते उत्साही असल्याचं दिसून आलं.

कोल्हापुरचे उमेदवार काय करतात?

न्यू पॅलेसवर सकाळी आठपासूनच शाहू छत्रपती महाराजांची (Shahu Maharaj Chhatrapati) कार्यकर्ते, वेगवगेळ्या तालुक्यांतील मतदारांनी भेट घेतली. सर्व तालुक्यातील प्रचार प्रमुखांनीही त्यांची भेट घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तर आज सकाळी कोल्हापूर शहर आणि परिसरातील सार्वजनिक तरुण मंडळांना भेट देत शिवजयंती सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवली. तर पुढील काही दिवसात प्रमुख नेते कार्यकर्ते यांचे आभार दौरा नियोजन केला जाणार आहे. खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) देखील त्यांच्या कोल्हापुरातील बंगल्यात थांबले होते.

सकाळपासूनच त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या भेटीला येत होते. कागल, मुरगूड, चंदगड या तालुक्यांतील मतदारांनी आणि काही प्रचार प्रमुखांनी त्यांची भेट घेऊन केंद्रावरील सविस्तर आढावा दिला. दुपारनंतर मंडलिकांनी थेट जिल्हा बँक गाठली. जिल्हा बँकेच्या संचालकांचा परदेश दौरा आहे. त्या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या बैठकीला ते हजर होते. शिवाय आज ते शिवजयंती सोहळा साजरा करणार्‍या तरुण मंडळांना भेट देत आहेत.

हातकणंगलेत काय चाललंय?

गेल्या 30 दिवसांपासून घरची भाकरी बांधून निवडणुकीच्या प्रचारात उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) आणि त्यांचे कार्यकर्ते काही काळ निवांत झाले आहेत. मात्र इतक्यावरच न थांबता ते उद्यापासून आभार दौरा सुरू करणार आहेत. काल दिवसभर त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेत मतदारसंघातील आढावा घेतला. कार्यकर्त्यांच्या भावना, मतदानातील डावपेच, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचाली, कुठे पैशाचा वापर झाला? कुणाला आमिष याबाबतची सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांना दिली.

तर महाविकास आघडीचे सत्यजित पाटील-सरूडकर हे आज सकाळपासून त्यांच्या सरूड (ता. शाहूवाडी) येथील घरी होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या चर्चेत भाग घेतला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तालुके त्यांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे तालुका आणि वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांतूनही कार्यकर्ते त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधत होते. तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे देखील घरीच थांबून कार्यकर्त्यांशी संपर्क साधत होते. इचलकरंजी रूकडी हुपरी पन्हाळा शाहूवाडी या भागातील कार्यकर्त्यांनी येऊन वस्तुस्थिती सांगितली.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT