Former MLA Rajesh Patil has been selected as Mahayuti's candidate for the Gokul chairman election in Kolhapur following a meeting of alliance leaders. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Chairman Election : अखेर गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा उमेदवार ठरला : बैठकीमध्ये 'या' उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

Rajesh Patil Gokul Mahayuti's candidate : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीमध्ये भाजपराष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू होती. अखेर नेत्यांच्या बैठकीत राजेश पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 10 Nov : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या नेत्यांची झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीमध्ये भाजपराष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या घटक पक्षांकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू होती. अखेर नेत्यांच्या बैठकीत राजेश पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीकडून राजेश पाटील उमेदवार असणार आहेत.

गोकुळच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शासनाकडून चार तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर गोकुळमधील सत्तासमीकरणे आणि अध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर महायुतीकडून अध्यक्षपदासाठी कोणत्या उमेदवाराला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

मात्र, आता राजेश पाटील यांचं नाव महायुतीकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स संपला आहे. दरम्यान, राज्य सरकारने गोकुळवर चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती केली. या नियुक्तीला समविचारी आघाडीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या नियुक्तींना स्थगिती देण्यास नकार देत चारही संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाची परवानगी दिली. त्यामुळे १२ संचालक असलेल्या महायुतीला चार अतिरिक्त मतांची साथ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवड आज (१० नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता होणार आहे. चार शासननियुक्त संचालकांची मते आणि महायुतीच्या संचालकांची भूमिका यामुळे या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT