Kolhapur News : लोकसभा, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता संधी न मिळालेल्या इच्छुकांना गोकुळ दूध संघाच्या म्हणजेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. गोकुळ दूध संघात महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. त्यांनी गत वेळी संघाच्या निवडणुकीत महाडिक गटाला फाईट देत संघ हिसकावून घेतला. मात्र गेल्या पाच वर्षातील राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने गोकुळच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे. नव्या राजकारणाने नवी समीकरण जुळल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका काय असणार? याकडे देखील लक्ष असणार आहे. दरम्यान येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
राज्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीइतकेच महत्त्व आहे. एकवेळ आमदारकी खासदारकी नको पण गोकुळ दूध संघाचा संचालक करा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संघाची निवडणूक पुढील मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
गतवेळी गोकुळमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर येथील राजकरणाची चर्चा राज्यभर झाली. आमदार- खासदारांसह जिल्हा परिषद सदस्यांसाठी गोकुळ महत्त्वाचे आर्थिक केंद्र मानले जाते. दूध, जनावरांमुळे गोकुळ जिल्ह्यातील गावागावांत पोहोचला आहे. त्यामुळे गोकुळ आणि राजकारण असे समीकरण तयार झाले आहे.
मागील निवडणुकीत महाडिक गटाकडे असणारी गोकुळची सत्ता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हिसकावून घेतली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महाडिक गटातील काही प्रमुख संचालकांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची साथ देत सत्ता उलथून टाकली होती.
मात्र यंदाचे समीकरण वेगळे आहे. गोकुळ दूध संघांमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची सत्ता आहे. राज्यात ज्याची सत्ता आहे त्याच्या हातात यंत्रणा ठेवत आजवर गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्याची दिसून येते. भाजपमध्ये असणारे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, भाजपचे आमदार अमल महाडिक हे देखील यंदा गोकुळच्या निवडणुकीत सर्वस्व पणाला लावण्याची शक्यता आहे.
महायुतीमधील मुश्रीफ हे सतेज पाटील यांच्यासोबत असल्याने गोकुळच्या निवडणुकीत मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी घेतलेली भूमिकेमुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत इतर आमदार मदत करतील? याची शक्यता कमी आहे. मात्र या सर्वांच्या जोडण्या आमदार सतेज पाटील कसे लावणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.
पाहता पाहता पाच वर्षे निघून गेली, पुढील वर्षी गोकुळची निवडणूक असणार आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच याद्या तयार करण्यापासून संस्थांचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. ठराव जमा करण्यापासून होणारी ही प्रक्रिया गतवेळी खूप गाजली होती. त्यामुळे पुढील वर्षी प्रत्यक्षात मतदान असले तरीही इर्षा, स्पर्धा ही या वर्षाच्या शेवटीच दिसून येणार आहे.
विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ मेमध्ये संपत आहे. पुढील कार्यकाळ पाहता, आगामी अध्यक्षांसाठी तो फार कठीण असणार आहे. त्यामुळे डोंगळेच अध्यक्ष राहणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, यावरही पुढील निवडणुकीचे राजकरण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोकुळमध्ये नेत्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. हीच परंपरा या निवडणुकीत कायम राहणार की राज्यभरातील राजकरणाप्रमाणे येथेही राजकरण बदलणार हे लवकरच दिसून येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.