Kolhapur Politics : कोल्हापूरच्या महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पुढार्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. जिल्हा परिषदेचा धुरळा खाली बसताच गोकुळ आणि जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होणार आहे. याच दोन्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी प्रत्येक तालुक्यात विचित्र आघाड्या केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय भवितव्य अत्यंत उत्सुकतेचे बनले आहे.
जिल्हा परिषद निवडणूक संपल्यानंतर कोणत्याही क्षणी गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर तशी तयारी सुरू असून पुढील महिन्यात गोकुळला मतदार यादी बनवण्यासाठी दुग्ध निबंध कार्यालयाकडून पत्र येण्याची शक्यता आहे. साधारण मार्च महिन्यापासून मतदार याद्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे. त्यानंतर मे महिनाअखेर गोकुळच्या निवडणुकीचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून प्रशासन काही प्रमाणात मोकळे होईल. तेथून पुढे जिल्ह्यातील सहकारातील मोठी संस्था असलेल्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. याचा पहिला टप्पा म्हणून याद्या तयार करण्याचे काम सुरू होणार आहे.
विभागीय उपनिबंधक (दुग्ध) कार्यालयाकडून 'गोकुळ'ला मतदार यादी पाठविण्यासंदर्भात पत्र दिले जाईल. यानंतर 'गोकुळ'कडून सभासदांची यादी निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाला दिली जाईल. ही यादी अद्ययावत करण्यात येईल. यादी अद्ययावत झाल्यानंतर संस्थांच्या ठरावाबाबतचे पत्र येईल. येथून पुढे खऱ्या अर्थाने 'गोकुळ'च्या निवडणुकीची लगीनघाई सुरू होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वी 'टोकण' स्वरूपात सुरू झालेली 'गोकुळ'मधील ठरावाची चर्चा मध्येच थांबली आहे. त्याला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अधिक वेग येणार आहे. या निवडणुकीत 21 ऐवजी 25 संचालक असणार आहेत. त्यामुळे येथे प्रत्येक तालुक्यातील एक प्रतिनिधित्व असणार आहे. अपेक्षित विरोध मावळत आल्याचे गेल्या काही महिन्यांत दिसून आले आहे. त्यामुळे 'गोकुळ'च्या निवडणुकीत पूर्वीसारखी रंगत येणार की, शेतकरी संघ आणि जिल्हा बँकेसारखा समझोता होणार, हे पुढील परिस्थितीच ठरवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.