Shaumika Mahadik’s Entry and Its Political Impact : मागील 25 वर्षाच्या राजकारणात गोकुळ दूध संघात माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाची साथ होती. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील आणि अरुण डोंगळे ही बलस्थाने होती. मात्र मागील पाच वर्षाच्या निवडणुकीत हे दोन्ही शिलेदार मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांच्या गळाला लागले आणि गोकुळ दूध संघावरील महाडिक गटाची सत्ता खालसा झाली.
आता पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार असल्याने महायुती म्हणून पुन्हा समीकरणे बदलणार आहेत. अरुण डोंगळे महायुतीत जाणार आहेत. तर महाडिक-मुश्रीफ एकत्र येणार असल्याने माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील हे नेमके कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र गोकुळच्या विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटातच खडा टाकला आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संचालिका महाडिक यांनी थेट विश्वास पाटील यांनाच "आबाजी..पुढच्या वर्षी आपल्याला वेगळ्या भूमिकेत भेटायचे आहे’, असे उद्देशून केलेल्या वक्तव्याने उपस्थित संचालकांच्या भुवया उंचावल्या. यावर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
बसण्यासाठी न दिलेल्या खुर्चीबाबत महाडिक यांनी तक्रार करताच क्षणाचाही विलंब न लावता ‘तुम्हाला व्यासपीठावर मानाची खुर्ची दिली जाते. पण, तुम्हीच कधी मान घ्यायला व्यासपीठावर आला नाही. आजही तुम्हाला व्यासपीठावर खुर्ची ठेवली आहे. तुम्ही अजूनही येऊन बसू शकता, असे आवाहन ‘गोकुळ’चे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले.
‘गोकुळ’च्या सभेसाठी येणाऱ्या सभासदांच्या स्वागतासाठी सभागृहाबाहेर उभारलेल्या संचालक मंडळामध्ये समोरासमोरच खुमासदार टोलेबाजी रंगली. अध्यक्ष मुश्रीफ यांच्यासह ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांनाही महाडिक यांनी नमस्कार करत इतर सभासदांच्या स्वागतासाठी त्या उभ्या राहिल्या होत्या. सत्ताधारी संचालक आणि विरोधी पक्षाच्या संचालिका स्वागतासाठी एकत्र उभे असल्याचे पाहून सभासदांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी संचालकांत खुमासदार चर्चा रंगलीच, पण एकमेकांचे चिमटेही काढले.
एकत्र आलेल्या संचालकांमध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘पूर्वी आप्पा (महादेवराव महाडिक) म्हणायचे, पृथ्वी गोल आहे. कोण कुठेही गेला तरी पुन्हा त्याच ठिकाणी येतो.’ यावर शौमिका महाडिक म्हणाल्या, ‘आबाजी, पुढच्या वर्षी आपल्याला वेगळ्या भूमिकेत भेटायचे आहे.’ मात्र, ही वेगळी भूमिका कोणती, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.
पाटील यांनीही त्याला काही उत्तर दिले नाही. अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह इतर संचालकांसोबत शौमिका महाडिक स्वागताला उभ्या असल्याचे पाहून एकाने मुश्रीफ यांना यावर्षीची सभा शांततेत होणार का? असा सवाल केला. यावर, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी हा प्रश्न नविद यांना विचारण्याऐवजी ‘त्यांच्या लाडक्या बहिणीला म्हणजे महाडिक यांना विचारा,’ अशी मिश्कील टिप्पणी करताच सर्वच संचालकांमध्ये जोरदार हशा पिकला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.