Samarjeet Ghatge, Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : समरजीत आपलेच, त्यांच्यावर काही बोलायचं नाही! चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना टाकलं बुचकळ्यात

Rahul Gadkar

Kolhapur News : काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दाखल झालेल्या समरजितसिंह घाटगे यांच्याविषयी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुचकळ्यात टाकणारे विधान केले आहे. समरजीत आपलेच असून त्यांच्याविषयी काही बोलू नका, असा सल्ला त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.

कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीतील महाडिक गटाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा करण्यासाठी महाडिक गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघ हा राजकीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.

राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. समरजीत घाटगे हे आपलेच आहेत. एखादा मुलगा चुकला म्हणजे त्याला आपण शिक्षा देत नाही. मतदान आपण महायुतीलाच करायचे. पण समरजीत घाटगे यांना कोणी काही बोलायचं नाही, असा अजब सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

समरजीत घाटगे हे आपले जिल्हाध्यक्ष होते. ते राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांचे जनक घराण्याचे वंशज आहेत. त्यांचा अनादर होऊ देऊ नका. आगामी निवडणुकीत काही गडबड करू नका, हे सांगायलाही चंद्रकांतदादा विसरले नाहीत.

राज्यात जर आपले सरकार आले नाही तर आपले काय होते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आपण पाहिले आहे. आपली सत्ता येणे महत्त्वाचे आहे. आपल्याला एखादा निर्णय नाही आवडला तरी देखील महायुतीलाच मतदान करायचे. महायुतीचे संभाव्य उमेदवार हे पालकमंत्री हसन मुश्रीफ हेच असतील, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगून टाकले.

दसरा झाला की आचारसंहिता

उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसरा झाल्यानंतर आचारसंहिता लागेल, असा दावा केला आहे. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांसोबत यापूर्वी बैठका झाल्या आहेत. जागा वाटपाचे सूत्र ठरले असून महायुती मधील घटक पक्षांनाही जागा सोडणार आहोत. 14 नोव्हेंबर तारखेपर्यंत मतदान होईल, असे संकेतही त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT