A tense meeting between Kagal’s key leaders reflects the shifting power dynamics under the Ghatge–Mushrif alliance. The photo highlights how Kagal politics is now firmly influenced by state-level leadership. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kagal Politics : मंत्री हसन मुश्रीफ-समरजीत घाटगेंची मनमानी संपुष्टात; गोकुळनंतर कागल तालुक्याच्याही राजकीय चाव्या CM फडणवीसांकडे

CM Fadnavis' control over Kolhapur politics : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते कोसळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यामार्फत अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बुडाखाली ईडीचे सुरुंग लावले. त्यात कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश होता.

Rahul Gadkar

Kolhapur News, 20 Nov : कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांची अनपेक्षित युती झाली. पण या युतीमागे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही गट काही दिवस एकमेकांचे राजकारणच संपवायला निघालेले. पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकत्र येत असतील तर भविष्यातील कागल तालुक्यातील अनेक राजकीय घडामोडी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातूनच सोडवल्या जातील हे स्पष्ट आहे.

कागलच्या राजकारणात आगामी लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो सर्वांचा मार्ग आता फडणवीसांनाच काढावा लागणार आहे. त्यामुळे सहाजिकच कागलच्या राजकारणावर फडणवीसांचे नियंत्रण असणार आहे. शिवाय कागलच राजकारण मुश्रीफ आणि घाटगे यांच्या निर्णयावर अवलंबून असले तरी त्यांच्या सर्व चाव्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच असणार आहेत.

राज्यात झालेल्या पहाटेच्या युतीमुळे आणि कागल तालुक्यामध्ये झालेल्या सायंकाळच्या युतीमुळे अनेकांची झोप उडाली. मात्र या दोन्हीच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलच्या राजकारणात हा युतीचा खेळ नवा नाही. त्यामुळे १०० टक्के राजकारणाने व्यापलेला कागल तालुका कोल्हापूरच्या राजकीय पटलावर कायमच चर्चेत राहिला आहे.

स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून ते माजी खासदार संजय मंडलिकांपर्यंत, स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून ते राजे समरजीत सिंह घाटगे यांच्यापर्यंत आणि संजय घाटगे यांच्यापासून ते अंबरीश घाटगे या सर्वांचे राजकारण जवळून पाहणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. मात्र कागलच्या इतिहासात आजपर्यंत जे काही राजकारण झालं, शत्रूचे मित्र आणि मित्राचे शत्रू झाले.

युती झाली, आघाड्या झाल्या, मनोमिलन झाले. पण याला सर्वांगीण कारणीभूत हा राजकीय सोयीस्करपणा हाच होय. जे काही निर्णय झाले हे स्वतःच्या व्यक्तिगत निर्णयाने झाले. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री मुश्रीफ एकत्र असताना त्यांच्या विरोधात दिवंगत विक्रमसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे यांनी आघाडी केली होती. तर मंत्री मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर माजी आमदार संजय घाटगे आणि मंडलिक हे एकत्र आले होते. कधी कधी मुश्रीफ आणि संजय घाटगे यांनीही राजकीय मैत्री दाखवली आहे.

तर याच राजकारणात कधी राजे गट घाटगे आणि मंडलिक गट देखील हे देखील एकत्र पाहायला मिळाले. मात्र या सर्वांच्या निर्णयामागे व्यक्तिगत निर्णयाचे प्रमुख कारण होते. त्यांना व्यक्तिगत निर्णय घेण्याची मुभा होती. या निर्णयाने कधीही कागलची लक्ष्मी टेकडी ओलांडली नाही. स्थानिक पातळ्यांवर वेळोवेळी कार्यकर्त्यांची गोची झाली असली तरी त्यांची समजूत काढण्यात ते यशस्वी झालेत. मात्र दुसरीकडे २ दिवसांपूर्वी अनपेक्षित झालेल्या युतीमुळे कार्यकर्ते दहशतीखाली आहेत.

कारण यापूर्वी व्यक्तिगत आणि निर्णय घेण्याला स्वातंत्र्य असल्याने त्याच्यावर कोणत्याही मर्यादा आल्या नव्हत्या. पण आता कागलच्या राजकारणाने केवळ कागल तालुक्याची नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याची वेस ओलांडली आहे. ते मुंबईपर्यंत गेले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीत घाटगे यांच्या युतीवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे सहाजिकच दोघांवर दबाव वाढल्याने घाटगे आणि मुश्रीफ यांची युती झाली. हे देखील तितकच खरे आहे. त्याला कारणे देखील अनेक आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते कोसळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यामार्फत अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांभोवती ईडीचे जाळे फेकले होते. त्यात कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश होता. तत्कालीन भाजपचे नेते समजीत घाटगे यांच्या मदतीनेच किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यासाठी ईडीची दारे ठोठावली. कारवाईची भीती आणि वाढलेला दबावाखाली केवळ राष्ट्रवादी नव्हे तर शिवसेना देखील भाजपला मिळाली.

त्यामुळे राज्यात महायुती स्थापन झाली. त्यानंतर ईडीची कारवाई देखील थांबली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटवर्ती. पण महायुतीत राहून देखील घाटगे यांचे हात बांधले गेले. विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधातील धार घाटगे यांची कायम होती. त्यामुळे व्यक्तिगत निर्णय घेऊन मंत्री हसन मुश्रीफ म्हणजेच महायुतीच्या विरोधात भाजपशी बंडखोरी करत विरोधात घाटगेनी शड्डू ठोकला. घाटगे यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते.

विधानसभा निवडणुकीत घाटगे यांचा पराभव झाल्यानंतर मात्र राजकीय अहंकार गिळून पडला. त्यामुळे हतबल झालेल्या घाटगे यांनी कधी भाजपचे तर कधी शिवसेनेचे दार ठोठावले. मात्र त्यांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर पडला. भाजपसोबत नसल्यामुळे समरजीत घाटगे यांची राजकीय अडचण झाली. तर ईडीची तक्रार असणारी अनेक महत्त्वाचे दुवे समरजीत घाटगे यांच्याकडे असल्याने मुश्रीफ यांची अडचण आहे.

तर दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफ जुळवून घेत नसल्याने शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांच्या अडचण झाली. मंत्री मुश्रीफ यांचे जवळचे मित्र असल्याने भाजपचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांची कोंडी झाली. या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत आणि एकाच दगडात जवळपास चार ते पाच पक्षी मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकारण साधून घेतले आहे.

इतकेच नव्हे तर कागलच्या राजकारणातील चाव्या आणि सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांनी अदृश्य शक्तीचा हात आपल्या जोपर्यंत डोक्यावर आहे. तोपर्यंत युती कायम राहील असा दावा दोघांनीही केला. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यावर नियंत्रण राहणार आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील किंवा लोकसभा विधानसभा निवडणुकीतील आघाडी आणि युती करण्यामागे स्वातंत्र्य घाटगे आणि मुश्रीफ यांना असेल का? हे पहावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अबोला आहे. त्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम देखील कागल तालुक्यावर झालेला दिसतो. शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक हे महायुतीचे असताना देखील त्यांना या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी घाटगे आणि मुश्रीफ यांना एकत्र करण्यामागे काहीतरी शिजते हे नक्की.

तर दुसरीकडे कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांना देखील नगरपालिका निवडणुकीपासून लांब ठेवणे आणि उमेदवारांना अर्ज माघार घ्यायला सांगणे, हे देखील कागलच्या राजकारणावर मुख्यमंत्र्यांची पकड करण्यामागचं उदाहरण असू शकते. यापूर्वी गोकुळच्या अध्यक्षनिवडीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारे लक्ष घातले होते. अरुण डोंगळे यांचा राजीनामा फडणवीस यांच्याच शब्दामुळे झाला नव्हता. त्यानंतर फडणवीस यांच्याच शब्दावर त्यांचा राजीनामा झाला आणि नवीद मुश्रीफ यांना खुर्चीवर बसवण्यात आले होते. त्यामुळे तिथेही मुश्रीफांची मनमानी संपुष्टात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT