

नागेश गायकवाड :
विरोधकांना गाफील ठेवून माजी आमदार राजेंद्र देशमुख यांची राष्ट्रवादी आणि भारत पाटील व आनंदराव पाटील यांची स्वाभिमानी आघाडीने युती करून नगराध्यक्ष - नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनी ओबीसी नगराध्यक्षपदासाठी सौरभ पाटील यांचा कुणबीतून अर्ज भरून साऱ्यांनाच धक्का दिला. राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीची युती आणि नगराध्यक्ष उमेदवाराचा विरोधकांना शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नव्हता. राष्ट्रवादी- स्वाभिमानी युतीने निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे.
आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक डावपेच, शह-प्रतिशह आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी यांनी पहिल्या टप्प्यात गाजली आहे. सुरुवातीला अमरसिंह देशमुख यांनी भाजप अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरून विरोधकांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावर उलटसुलट चर्चा झाली. मात्र त्यांच्यात तोडगा निघाला. नंतर आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी एकत्र येत नगरसेवकपदासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करून शिवसेना आणि राष्ट्रवादीला धक्का दिला.
इकडे शिवसेनेने सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन तगड्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. तानाजीराव पाटील यांनी सक्षम उमेदवार देऊन भाजपचे शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी, बाबासाहेब देशमुख बँकेचे संचालक सूर्यकांत दौंडे, देशमुख गटाचे सोमनाथ जवळे अशा अनेकांना गळाला लावून भाजपला धक्क्यावर धक्के दिले. स्वाभिमानी आघाडीचे आनंदराव पाटील व भारत पाटील यांनी देशमुख बंधूंना सोबत येण्याचे आवाहन करून स्वतंत्र निवडणुकीची तयारी सुरू केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख बंधू अमरसिंह देशमुख यांच्या सोबत जातील, अशी चर्चा होती. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेशी तर स्वाभिमानीने भाजपाशी वरकरणी बोलणीत गुंतवले. प्रत्यक्षात राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी यांची पडद्यामागे चार दिवसांपूर्वीच युती झाली होती. रणनीतीचा भाग म्हणून विरोधकांशी बोलणी सुरू ठेवून त्यांना अंधारात ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी युतीने ओबीसी नगराध्यक्षपदासाठी कुणबी दाखल्यावर मराठा सौरभ पाटील यांचा अर्ज भरण्याचा डाव यशस्वी केला.
या रणनीतीने भाजप आणि शिवसेनेला राष्ट्रवादी- स्वाभिमानी युतीने आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे दोघांची युती आणि कुणबी उमेदवार याचा भाजप आणि शिवसेनेला थांगपत्ता लागला नाही. स्वाभिमानीने काही उमेदवाराचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नावावर अर्ज भरले होते. राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवार उतरवण्याचे खरे नियोजन होते. मात्र पक्षाचे एबी फॉर्म वेळेत न मिळाल्याने तो डाव फसला. एकंदरीत, नगरपंचायतीची पहिली निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या टप्प्यात डाव- प्रतिडाव, शह- प्रतिशह, फोडाफोडी आणि रणनीती यांनी गाजली आहे.
शिवसेनेने राजेंद्र देशमुख सांगतील त्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यावर चर्चा झाली होती. त्यात पंढरीनाथ नागणे यांच्या नावावर एकमत झाले होते. राष्ट्रवादीने दुसरा डाव टाकला होता. त्यांनी शेवटच्या क्षणी ऑफर धुडकावली. राष्ट्रवादीतून इच्छुक नागणे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. तेव्हा हे बिंग बाहेर पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.