Kolhapur Latest Politics : राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावरही त्याचा परिणाम झाला. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला तर राष्ट्रवादीतून अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडले. कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आणि मागील निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार होते. या फुटीनंतर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गट नेतृत्वहीन बनला आहे.
तीच परिस्थिती राष्ट्रवादीबाबत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा चेहरा कोण? हे शोधण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट (Shivsena) आणि राष्ट्रवादी शरद पवार (NCP) गटाचे नेतृत्व कोण करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय या दोन्ही गटाची मदार कोणत्या पक्षावर आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे 2014 ला सहा आमदारांची ताकद होती. तर 2019 ला दोन खासदार आणि एक आमदार अशी परिस्थिती होती. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत असताना 2019 काँग्रेसने मारलेली मुसंडी लक्ष्यवेधी ठरली आहे. 2019 नंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधील जिल्ह्यातील नेतृत्वांनी मांडीला मांडी लावून काम केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री पद काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्याकडे गेल्याने सहाजिकच तिन्ही पक्षामध्ये सतेज पाटील यांच्याबाबत नेतृत्वाची भावना तयार झाली. त्याचा प्रत्यय कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत आला. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस असल्याने त्या ठिकाणी पुन्हा काँग्रेसचा उमेदवार दिला. पण पोटनिवडणुकीत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी देखील या जागेवर दावा केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. कोल्हापूर शिवसेनेतील दोन्ही खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे माहितीत आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार (Sanjay Pawar), सहसंपर्कप्रमुख विजय देवणे हे महाविकास आघाडीत आहेत. केवळ संजय पवार सोडल्यास मध्यंतरी विजय देवणे यांच्याबाबत मातोश्रीवर तक्रार झाल्यानंतर त्यांचे जिल्हाध्यक्ष पद काढून घेण्यात आले. अशातच आगामी विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नेतृत्व कोण करणार? असा सवाल ही शिवसैनिकांमध्ये आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची हीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यापाठोपाठ आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील (K P Patil) या यांच्याकडे राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून जिल्ह्यात पाहिले जाते. कागल, चंदगड, राधानगरी राष्ट्रवादीचे बलस्थान आहे. हे तिघेही नेते महायुतीत गेल्याने राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) यांचा गट कुमकुवत झाला आहे. त्यात नव्या चेहर्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना शरद पवार यांचे विश्वासू सहकारी व्ही. बी. पाटील यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीत कम्युनिकेशन गॅप वाढल्याने नेतृत्व कोणाकडे पहावे? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांना आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्याकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे चांगले दिवस असताना या लोकसभा निवडणुकीमुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब आणखी गडद झाला आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सतेज नेतृत्व मान्य झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मतदार सध्या तरी काँग्रेसवर आहे असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.