Chetan Narke News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chetan Narke News: छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी...सुरेश भटांची कविता म्हणत कोल्हापूरच्या आखाड्यातून घेतली माघार

Rahul Gadkar

Kolhapur Political News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत असलेले गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके (Gokul Director Dr. Chetan Narke) यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.

पक्षाशिवाय ही निवडणूक लढवणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून (Kolhapur Lok Sabha elections 2024) माघार घेत असल्याची घोषणा केली. मात्र, पुढील काळात आपण राजकारणात सक्रिय होणार असल्याची घोषणादेखील या वेळी नरके यांनी केली.

गेल्या दोन वर्षांपासून गोकुळचे संचालक चेतन नरके हे निवडणुकीची तयारी करत होते. कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची सुरू होते. महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची त्यांची इच्छा होती.

शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेतही होते. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटल्याने त्या ठिकाणी शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली. तरीही अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी दर्शवली होती.

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यावर आज गोकुळचे संचालक नरके यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.

सामान्य जनता माझा पक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे विकास व्हिजन घेऊन मी लोकसभेच्या रिंगणात राहणार असल्याची घोषणा केली होती. आजही आपली इच्छा आहे. मात्र, पक्षीय ताकद महत्त्वाची आहे. 7 मे रोजी मतदान होईल. पण 8 मेपासून पुन्हा मी मैदानात, राजकारणात मी सक्रिय असेन, असेही नरके यांनी स्पष्ट केले.

महायुती आणि आघाडीकडून संपर्क

गेल्या पंधरा दिवसांत नरके यांच्याकडे महाविकास आणि महायुतीतील काही नेत्यांनी संपर्क केला आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनीदेखील नरके यांची दोन वेळा भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील नरके यांच्याशी संपर्क साधला आहे.

निवडणुकीतून माघारी घेत असताना त्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवलं नसले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्तात आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा केली जाईल, असेही नरके यांनी सांगितले आहे. सुरेश भट यांची कविता म्हणत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

" विझलो आज जरी मी,

हा माझा अंत नाही...

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही...

छाटले जरी पंख माझे,

पुन्हा उडेन मी.

अडवू शकेल मला,

अजून अशी भिंत नाही...

माझी झोपडी जाळण्याचे,

केलेत कैक कावे...

जळेल झोपडी अशी,

आग ती ज्वलंत नाही...

रोखण्यास वाट माझी,

वादळे होती आतूर...

डोळ्यांत जरी गेली धूळ,

थांबण्यास उसंत नाही...

येतील वादळे, खेटेल तुफान

तरी वाट चालतो...

अडथळ्यांना भिवून अडखळणे,

पावलांना पसंत नाही..."

-सुरेश भट

(Edited by: Mangesh Mahale)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT