Kolhapur lok sabha Constituency 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: शेवटच्या क्षणापर्यंत लोकसभेचा सर्व्हे; त्यावरच ठरणार कोल्हापूर-हातकणंगलेतील रणनीती

Kolhapur lok sabha Constituency 2024: राजनीतीकार प्रशांत किशोर आणि चाणक्य संस्थेकडून हे सर्व्हे सुरू असल्याचे सांगून मतदारसंघाचा आणि उमेदवारांचा आढावा घेतला जात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur: 'कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील (lok sabha Constituency 2024)उमेदवारी जाहीर करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी असतानाही थेट दिल्लीतून अजून सर्व्हेच सुरू आहेत. विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली तर ते विजयी होतील का? त्यांची जमेची आणि कमकुवत बाजू कोणती, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, कोल्हापूरकरांचा (Kolhapur lok sabha Constituency 2024) कौल कोणाकडे आहे, ‘महाविकास आघाडी’ की ‘महायुती’ ? असे संदर्भ या सर्व्हेतून पुढे येत आहेत.

देशात जे घडते त्याच्या काहीसे उलटे चित्र कोल्हापूर जिल्ह्यात असते. येथे लाट वगैरे काही नसते. येथे कोल्हापूरकरांनी ठरविले तेच होते. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी उमेदवारी कोणाला द्यावी, विद्यमान खासदारांना दिल्यास दगाफटका होईल की त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल, याचा अंदाज खुद्द नेत्यांनाही लागत नसल्याची आजची स्थिती आहे. त्यातून वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील ग्राउंड रिपोर्ट काय सांगतो, यासाठी दिल्लीतून वेगवगेळे सर्व्हे सुरू झाले आहेत. राजनीतीकार प्रशांत किशोर आणि चाणक्य संस्थेकडून हे सर्व्हे सुरू असल्याचे सांगून मतदारसंघाचा आणि उमेदवारांचा आढावा घेतला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यात दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार कोण, यावर महायुतीचे उमेदवार विजयी होतील की नाही हे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj)यांचे नाव आघाडीवर असेल, असे गृहीत धरले आहे, तर हातकणंगलेतून माजी खासदार राजू शेट्टी हेच अपक्ष म्हणून रिंगणातील मुख्य उमेदवार गृहीत धरले जात आहेत. खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलिक हे विद्यमान असूनही अद्याप त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचे दिसत नाही, तरीही महायुतीचे उमेदवार तेच असतील, अशी त्यांची तयारी सुरू आहे.

रिपोर्टकार्डच्या आधारावर रणनीती

सर्व्हेतून सखोल अभ्यास करून केवळ उमेदवारी नव्हे तर विजय झाला पाहिजे, इथंपर्यंतची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या व्यक्तींशी संवाद साधला जात आहे. काहींना प्रत्यक्षात भेटून ही माहिती अर्थात ग्राउंड रिपोर्ट घेतला जात आहे. याच रिपोर्टकार्डच्या आधारावर जिल्ह्यातील ‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील रणनीती आखली जात असल्याचे दिसते.

सर्व्हेमधून पडताळणी ...

शिवसेना शिंदे गटात असलेले दोन्ही विद्यमान खासदार हे पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील होते. तेव्हा त्यांनी भाजप आणि शिवसेना अशा युतीतून निवडणूक लढवली होती. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्हीमध्येही फूट पडली आहे. या सर्वांची ताकद या दोन्ही उमेदवारांना मिळणार काय? यापूर्वी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांचा तगडा पाठिंबा होता. आता तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असणार आहे. त्याचीही सर्व्हेमधून पडताळणी केली जात आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT