Maharashtra Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : शिंदे गटावर भाजप कब्जा करणार? कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये भाजपची प्रचारात बाजी

Maharashtra Politics : शिंदे गट अजून महायुतीच्या चर्चेवर अवलंबून आहे की काय?

Mangesh Mahale

राहुल गडकर

Kolhapur News : महायुती असो व महाविकास आघाडी ही आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेची चाचपणी करत आहे. दोघेही विधानसभेचे गणित डोळ्यांसमोर ठेवूनच लोकसभेला सामोरे जात असल्याचे चित्र आहे. मात्र, व्यक्तिगत भाजपने विधानसभेपेक्षा सध्या तरी लोकसभेला अधिक महत्त्व दिले आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले लक्ष केंद्रित केले आहे. विद्यमान शिंदे गटाच्या दोन खासदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजपने आपले प्रस्थ वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपने आतापासूनच कंबर कसली असली, तरी शिंदे गट अजून महायुतीच्या चर्चेवर अवलंबून आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकसभेसाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष भाजपचे असून, कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे अस्तित्व निर्माण करायचे, असा चंग बांधला आहे.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. शिंदे गटाच्या किल्ल्यातून (कोल्हापूर व हातकणंगले) भाजपने आपल्या मिशनची सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार असणाऱ्या कोल्हापूर मतदारसंघात भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आतापर्यंत तीन दौरे करत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. राज्यातील ज्या 18 जागांवर भाजपने उमेदवार दिले नव्हते तिथे निवडणूक लढवणार असल्याचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या दौऱ्यामुळे भाजपच्या हालचाली आतापासूनच लक्षात यायला सुरुवात झाली आहे.

शिंदे गटाकडून आतापर्यंत केसरकर यांचाच दौरा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मास्टर स्ट्रोक खेळण्यास सुरुवात केली असताना, शिंदे गटाचे विद्यमान दोन खासदार असणाऱ्या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विविध विकासकामांच्या उद्घाटनावरून दौरे केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वैयक्तिक शिंदे गटाचा दौरा केला, पण तो उत्तर विधानसभा मतदारसंघापर्यंतच मर्यादित होता. लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून आतापर्यंत शिंदे गट केवळ महायुतीच्या चर्चेवरच अवलंबून आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांचा दौरा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इस्लामपूर, गडहिंग्लज, कोल्हापूर या ठिकाणी मेळावे घेतले. वॉरियर्स मेळावे घेऊन त्यांनी एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे .

घराघरांत भाजपचा मनोदय

केंद्रीय पक्ष नेतृत्वाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात घराघरांमध्ये भाजप पोचवण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शिंदे गट भाजपसोबत असताना भाजपने आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकला चलो ची भूमिका घेतली आहे.

शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे, पण तत्पूर्वी भाजपने स्वतंत्रपणे निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने ना यापासून दूर ठेवून पक्षीय कार्यक्रम एक हाती राबवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

विद्यमानांना उमेदवारी मिळणार ?

भाजप शिंदे गट एकत्र निवडणुकी लढल्यास लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार, असा विश्वास खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना आहे. पण लोकसभेला अजून सहा महिन्यांचा अवधी आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहणार आहे. या सहा महिन्यांत काय घडणार हे निश्चित सांगता येणार नाही. जर महायुती एकत्र लढल्यास विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आता तरी दिसून येत आहे, पण भाजपचा सर्जिकल स्ट्राइक शिंदे गटावर सुरू असून, शिंदे गट अजून तरी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज नसल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT