Kolhapur Political News : गोकुळ दूध संघ असो वा महानगरपालिका, लोकसभा असो वा मंत्रीपदासाठी सुरू असलेली स्पर्धा, यावरून कोल्हापुरातील महायुतीमधील अंतर्गत वाद आणि त्यानिमित्ताने नेत्यांची खदखद गेल्या दोन दिवसांपासून बाहेर पडत आहे. विविध घटनांमुळे महायुतीची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. आगामी काळात हा वाद आणखीन विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेले कुरघोडीचं राजकारण आणि मंत्रीपदावरून सुरू असलेली पक्षांमधीलच नेत्यांमधील स्पर्धा, यावरून जिल्ह्याचे राजकारण गेल्या दोन दिवसांपासून अधिक तापले आहे. त्यामुळे महायुतीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वी इचलकरंजी मतदारसंघामध्ये एका कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणुकीचा शड्डू ठोकला. सध्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे हातकणंगले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे माने गटाचा असंतोष वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून आवाडे आणि माने यांच्यात अंतर्गत स्पर्धा सुरू झाली होती.
मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाडे यांची समजूत काढून खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी दिली. आता आवाडे यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानंतर दोन्ही गटांचा अंतर्गत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतीतील जवळपास ६३९ संस्था अपात्र केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाडिक गटाचा संघर्ष पेटला आहे. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या गोंधळामुळे दोन्ही गटांतील दरी अधिक रुंदावली आहे. महाडिक व मंत्री मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर एकमेकांना आव्हान देण्याची भाषा या ठिकाणी दिसून आली.
गेल्या सहा महिन्यांपासून संस्था पात्र-अपात्रवरून कुरघोडीच्या राजकारणामुळे संस्थाचालक कमालीचे संतप्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवण्याची भाषा दोन्ही गटांकडून केली गेल्याने महायुतीमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला गेले. राष्ट्रवादीतून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तर सार्वजनिक आरोग्य मंत्री शिवसेनेतून प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाली. मात्र, मंत्रिपदासाठी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे देखील इच्छुक असल्याने वारंवार त्यांनी आपली खंत व्यक्त करून दाखवली आहे.
अशातच दोन दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपद न मिळायची खंत व्यक्त करत जिल्ह्यात म्हणावे तसे पक्ष संघटनेचे काम झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे पालकमंत्री आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे आहे. हे दोघेही शिवसेनेचे आमदार आहेत. पालकमंत्री आबिटकर यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी भविष्यात यासंदर्भातील खदखद बाहेर येणार हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे मंत्रिपदावरून सुरू असलेली अंतर्गत चुरस आणि त्यातून सुरू असलेली स्पर्धा हे महायुतीला भविष्यात बाधक ठरणार, यात शंका नाही.
मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीमधील राडा सर्व जनतेने पाहिला. कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती एकत्र सत्तेत असले, तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे गटनेते हे एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यापूर्वी देखील दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा भरसभेत केली होती. दोन्ही पक्षांचे प्रमुखच एकमेकांसोबत भेटल्यानंतर महापालिकेतील राजकीय वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन दिवसांत घडलेल्या या राजकीय घटनांमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, या घटनांमध्ये दूध उत्पादक शेतकरी, सर्वसामान्य कोल्हापूरकर आणि विकासाचा मुद्दा बाजूला पडत आहे. कोल्हापूरसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवसा स्वप्न दाखवत महायुती सर्वच ठिकाणी सत्तेत येऊ पाहत आहे. मात्र, दिवसा दाखवलेले स्वप्न हे प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य समन्वय साधून सत्ताकेंद्र चालवले पाहिजे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.