Hasan Mushrif, Sanjay Mandalik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur politics : एका स्टेटसमुळे कागलच राजकारण तापलं..., मुश्रीफ-मंडलिक गट धुमसतोय

Mandalik and Mushrif conflict : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडलिक गटासोबत मुश्रीफ गटाचा वाद धूमसत आहे. मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांकडून स्टेटसच्या माध्यमातून हा संताप व्यक्त केला जातोय. मुश्रीफ यांच्या पालकमंत्रिपदाला आणि विधानसभा निवडणुकीत विरोध केल्याचा समज करत मंडलिक गटाला टार्गेट केलं जात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 25 Jan : विधानसभा निवडणुकीत कागल (Kagal ) विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेत राहिला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या लढतीने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागल विधानसभा मतदारसंघ केंद्रस्थानी आला. शिवाय सुरुवातीला मंडलिक गटाने मुश्रीफांना केलेला विरोध विधानसभा निवडणुकीत मवाळ झाला.

पण विधानसभा निवडणूक होताच आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटगे नव्हे तर मंडलिक गटासोबत मुश्रीफ (Hasan Mushrif) गटाचा वाद धूमसत आहे. मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवार (ता.24) सकाळपासून स्टेटसच्या माध्यमातून हा संताप व्यक्त केला जात आहे. मुश्रीफ यांच्या कोल्हापूर पालकमंत्रिपदाला झालेला विरोध आणि विधानसभा निवडणुकीतील झालेला विरोध असा समज करत मंडलिक गटाला टार्गेट करण्यात येत आहे.

त्यामुळे चुकीला माफी नाही असं स्टेटस ठेवत कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. महायुती म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) , राष्ट्रवादीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि तत्कालीन भाजपचे नेते समरजीत घाटगे हे लोकसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून लढले. मात्र मंडलिकांना मतदारसंघातूनच कमी मताधिक्य मिळाल्याने मंडलिकांच्या कार्यकर्त्ये मुश्रीफांनी मदत न केल्याचा आरोप करत होते.

घाटगे यांच्यावर देखील मंडलिक गटाने आगपाखड केली होती. याचा बदला म्हणून विधानसभा निवडणुकीत मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी सुरुवातीला थेट मुश्रीफ यांना विरोध केला. तर घाटगे यांनी महाविकास आघाडीचा रस्ता धरला. नंतरच्या काळात माजी खासदार संजय मंडलिक यांनीच मुश्रीफ यांना पाठिंबा घोषित केल्याने विधानसभा निवडणुकीत मंडलिक गटाचा रोष मावळला.

विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांचा विजय झाला. मंत्रिमंडळ विस्तारात मुश्रीफांना स्थान मिळाले. तर मंडलिक यांचे खंदे कार्यकर्ते आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मुश्रीफ यांच्यात पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच झाली. मुश्रीफ यांना जिल्ह्यातील महायुतीमधील (Mahayuti) नेत्यांचा विरोध झाल्याने कोल्हापूर पालकमंत्री पदाची माळ आबिटकर यांच्या गळ्यात पडली. तर मुश्रीफ यांना वाशीमची जबाबदारी देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांना कमी मताधिक्य मिळाल्याची सल होती. शिवाय पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी देखील मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीचे विरोध केला होता. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विरोधामागे मंडलिकच असू शकतात अशी शंका मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांना आहे. कारण वीरेंद्र मंडलिक आणि नावेद मुश्रीफ हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येऊ शकतात.

मुश्रीफ-मंडलिक संघर्ष या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळू शकतो. यापूर्वी धूमसत असलेला वाद 2015 ला जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुश्रीफ यांनी कमी केला. मात्र मंडलिक यांचा विरोधक संजय घाटगे यांना सोबत घेतल्याने थेट मंडलिक यांनाच शह दिला आहे. कोरोनामुळे थांबलेल्या मंडलिक यांच्या हमीदवाड्यात सहकारी कारखान्याची निवडणूक येत्या काळात होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी बिनविरोध निवड झाली होती. मात्र मुश्रीफ गटाच्या हालचाली पाहता मंडलिक गटाची वाट खडतर करण्याच्या उद्देशाने सुरू असल्याचे दिसून येते. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत झालेल्या दगा फटकाचा बदला पालकमंत्रिदाच्या निवडीत घेतला. पण आता मुश्रीफ गटाकडून कारखान्याच्या निवडणुकीत बदला घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT