Kolhapur MahaPalika NCP ShivSena Clash : कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम करण्यात आला आहे. परिवहन समिती सभापती पदासाठी दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला अखेरच्या क्षणापर्यंत वरिष्ठ नेत्यांनी गोंधळात ठेवले. शेवटच्या क्षणी निर्णय दिल्याने शिवसेनेने सभापतीसाठी एकमेव अर्ज केला. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या चौकात महायुतीच्या नेत्यांविरोधात रोष व्यक्त केला.
कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती मधील घटक पक्षात अंतर्गत तणाव वाढला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परिवहन समिती सभापती पदावरून शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडल्यानंतर ही निवड अत्यंत चुरशीची बनली होती. 9 मार्च रोजी परिवहन सभापती निवड असल्याने अद्याप निर्णय झालेला नाही.
त्यातच आज शुक्रवारी (ता.6) अर्ज भरण्यासाठी तीन वाजेपर्यंतची मुदत असल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही अर्ज नेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दबाव वाढवण्याची खेळी सुरु होती. मात्र या निवडीसाठी शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देखील भाजपचा आधार घ्यावा लागणार होता. राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्हीही या पदासाठी आग्रही बनल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून हा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अर्ज कोणी करायचा? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीच कल्पना नव्हती.
दुपारपर्यंत हा निर्णय झालेला नव्हता. मात्र अर्ज करण्यासाठी शेवटचे दहा मिनिटे शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ नेत्यांकडून मानसी लोळगे यांचा परिवहन समिती सभापती पदासाठी अर्ज करावा अशा सूचना आल्या. मात्र तोपर्यंत महापालिकेच्या परिसरात राष्ट्रवादीचे कोणतेच नगरसेवक उपस्थित नव्हते. शिवाय अर्ज करण्यासाठी वेळ लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची या पदावरची संधी देखील हुकली. मात्र तत्पूर्वी शिवसेनेकडून सत्यजित जाधव यांचा परिवहन समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता. महायुतीकडून हा एकमेव अर्ज आल्याने सत्यजित जाधव हे सभापती पदाचे उमेदवार असणार आहेत.
मात्र शेवटच्या दहा मिनिटात निरोप दिल्याने राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांनी महायुतीच्या नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली. इतकेच नव्हे तर शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि फरास यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात येऊन आदिल फरास यांनी भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांना ही सुनावले.
आपण महायुतीत आहोत की नाहीत याचीच शंका मला आली आहे. कोणीतरी हट्टासाठी असा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही महानगरपालिकेत हलक्यात घेऊ नका. महायुतीचा जर निर्णय झाला होता तरी याबाबत आम्हाला कल्पना का दिली नाही? अशी विचारणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडी संदर्भात आपला कोणताही संबंध नाही. असे सांगत फरास यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.
महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर परिवहन सभापती पद हे राष्ट्रवादी काँग्रेसला जाईल असे सांगितले जात होते. शिवसेनेच्या वाटेला आलेले पद हे जनसुराज्य कडे गेल्याने परिवहन सभापती पदावर देखील शिवसेनेने आग्रह केला होता. शिवसेनेची चूक राष्ट्रवादी काँग्रेसवर लादण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही उमेदवाराला आमचा विरोध नाही. पण आम्ही महायुतीत आहोत याचा भास आम्हाला होतच नाही. कोणाकडेही आम्ही दाद मागणार नाही. आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिष्ठा आम्हाला महत्त्वाची आहे. अशी प्रतिक्रिया आदिल फरास यांनी सरकारनामाशी बोलताना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.