Kolhapur News: राज्यात शिंदे सरकारवर खोक्याचा आरोप होत असताना कोल्हापुरात मात्र मर्सिडीजची चर्चा जोरात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील रस्ते ठेकेदारांकडून शनिवार पेठेतील नेत्याने मर्सिडीज घेतल्याचा जाहीर आरोप ठाकरे गटाच्या रविकिरण इंगवले यांनी केला आहे.
मंगळवारी शिवसेनेचा ठाकरे गट रस्ते प्रश्न संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन केले. या बैठकीदरम्यान, रविकिरण इंगवले यांनी शनिवार पेठेत "तुम्हाला ती मर्सिडीज बघायला मिळेल", अशी हिंट अधिकाऱ्यांना दिली. त्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
कोल्हापुरातील रस्ते तयार करणारे ठेकेदार या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली प्रचंड तणावात आहेत. कोणत्याही क्षणी ते आत्महत्या करतील, अशी वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या जाहिराती माध्यमात दिल्या नाहीत तर त्यांच्यावर ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महापालिका कायद्याने चालते की, टक्केवारीवर चालते ? ११ टक्के मागणारा शिंदे सरकारमधील लोकप्रतिनिधी कोण ? त्यांना टोकन दिल्याशिवाय काम पुढे सरकत नाही का ? वॉरंटीतील रस्ते दुरुस्ती तसेच वर्क ऑर्डर देऊनही काम न करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्ट का होत नाहीत ? ठेकेदार महापालिका चालवतात का ? अशा प्रश्नांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला.
अधिकाऱ्यांचे ठेकेदारांवर नियंत्रणच राहिलेले नाही. अधिकाऱ्यांमुळे शहराची वाट लागत असल्याचा आरोप करत अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महेश उत्तुरेंसह इतर कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली.
काम करणे जमत नसेल तर अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी राजीनामा द्यावा, असे पवार यांनी सांगितले, तर विजय देवणे यांनी एका रात्रीत पदोन्नती मिळालेल्या शहर अभियंत्यांनी १०० कोटींच्या टक्केवारीचा ठेका घेतल्यासारखे वाटते. ते वसुलीचे ठेकेदार बनले असून, त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांची बदली करून त्यांच्या ठिकाणी दुसरे शहर अभियंते नेमा, अशी मागणी केली. तुम्ही राजीनामे दिले नाहीत तर तुमच्या खुर्च्यांना हात घालावा लागेल, असा इशाराही दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.