Satyajit Jadhav Shiv Sena chairman Kolhapur sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Election Controversy : निवड झाली गुलाल लागला, पण पहिल्याच दिवशी खुर्ची धोक्यात? कोल्हापूर महापालिकेत परिवहन निवडीवर काँग्रेसचा आक्षेप

kmc transport committee election controversy : कोल्हापूर महानगरपालिकेत परिवहन समिती सभापती निवडीवर काँग्रेसने अक्षेप घेतला आहे. यामुळे शिवसेनेचे सत्यजित जाधव यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Rahul Gadkar

  1. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदी शिवसेनेचे सत्यजित जाधव 8 विरुद्ध 5 मतांनी निवडून आले.

  2. निवडीनंतर काँग्रेसने स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्या मतदानावर आक्षेप घेतला.

  3. पदसिद्ध सदस्यांना मतदानाचा अधिकार नसल्याचा दावा करत काँग्रेसने आवश्यक असल्यास कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.

kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेत आज परिवहन समिती सभापती निवड पार पडली. 8 विरुद्ध 5 अशी निवड झाल्यानंतर शिवसेनेचे सत्यजित जाधव हे सभापती बनले. त्यांच्या नावाची घोषणा होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. पण पहिल्याच दिवशी काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी मतदान केल्यानंतर काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला. पदसिद्ध पदाधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसताना मत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. त्यावर पिठासीन अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाब समजावून घेऊन निर्णय देण्याची भूमिका घेतली. मात्र त्यावर निर्णय न झाल्यास कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला.

काँग्रेसकडून दिलेल्या निवेदननात म्हंटले आहे की, आज झालेल्या परिवहन समिती सभापती निवडमध्ये एकूण 12 परिवहन समिती सदस्य व पदसिध्द अध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती उपस्थित होते. परिवहन समिती सभापती निवडणूक सकाळी ठिक 11:55 वाजता सुरु झाली. यामध्ये नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन आपले मत दिले.

नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती यांना पदसिध्द सदस्य या नात्याने मतदानाचा अधिकार नाही. याबाबतचा आक्षेप परिवहन समिती सभापती पदाचे उमेदवार दुर्वास कदम यांनी घेतला होता. परंतु या आक्षेपाचा विचार न करता स्थायी समिती सभापती यांचे मतदान ग्राह्य धरणेत आले.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 27 मधील परिवहन समिती सभापती निवड यातील कलम 1 नुसार "परिवहन समितीने कलम 25 चे पोटकलम 2 अन्वये तिच्या नेमणूकीनंतर तिच्या पहिल्या सभेत आणि त्यापुढील प्रत्येक वर्षी त्याच महिन्याच्या तिच्या पहिल्या सभेत आपल्या सदस्यांपैकी एक सदस्यास सभापती म्हणून नेमले पाहिजे"

म्हणजेच कलम 25 (2) मध्ये 12 सदस्यांची निवड सांगितली आहे. त्यामुळे पदसिध्द सदस्य म्हणून स्थायी समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार नाही, हे कायद्यान्वये स्पष्ट होत आहे. तरी उपरोक्त कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात आलेली परिवहन समिती सभापती पदाची निवड रद्द करणेत येऊन नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात यावी. अन्यथा आम्हास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल याची नोंद घ्यावी, असा इशारा पत्रकाद्वारे काँग्रेस गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह परिवहन समिती सदस्यांनी दिला आहे.

स्थायी समिती सभापती हे पदसिद्ध पदाधिकारी आहेत त्यांना मतदानाचा कायदेशीर रित्या अधिकार नाही. मात्र तरी देखील त्यांनी मतदान केल्याने आम्ही परिवहन समिती सभापती पदावर आक्षेप घेतला आहे. महायुतीचे बहुमत असले तरी आमचा मतदान प्रक्रियेवर आक्षेप आहे, अशी प्रतिक्रिया सरकारनामाशी बोलताना काँग्रेस गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी दिली.

FAQs :

1. कोल्हापूर परिवहन समितीचे सभापती कोण झाले?
शिवसेनेचे सत्यजित जाधव 8 विरुद्ध 5 मतांनी सभापती म्हणून निवडून आले.

2. काँग्रेसने कोणत्या मुद्द्यावर आक्षेप घेतला?
स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी मतदान केल्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला.

3. काँग्रेसचा आरोप नेमका काय आहे?
पदसिद्ध पदाधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसताना त्यांनी मतदान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

4. या प्रकरणात पुढे काय होणार?
पिठासीन अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाब तपासून निर्णय देण्याची भूमिका घेतली आहे.

5. काँग्रेसची पुढील भूमिका काय असू शकते?
जर निर्णय समाधानकारक झाला नाही तर काँग्रेसने कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT