Kolhapur MahaPalika : कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीतून बाहेर पडत स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेला. मात्र एका जागेपलीकडे या पक्षाच्या हाती काहीही लागलेले नाही. याउलट या पक्षाने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडला. या राजकीय डावपेचामुळे पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत जनसुराज्य हा पक्ष चर्चेचा विषय ठरला आहे.
गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्यच्या उमेदवारांचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले. तर महापालिका निवडणुकीत भाजपसह काँग्रेसच्या उमेदवारांचा 'करेक्ट' कार्यक्रम झाला. निवडणुकीत जिंकण्यापेक्षा कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं याच भूमिकेत जनसुराज्य शक्ती हा पक्ष राहिला.
जिल्ह्यात 2 आमदार असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने शेवटच्या टप्प्यात रिंगणात उडी घेतली. महायुती म्हणून जागा वाटपाच्या बैठकीत आमदार विनय कोरे यांनी हजेरी लावली होती. पण अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे आरपीआय (आठवले गट) आणि कवाडे गटाला सोबत घेऊन 30 जागांवर निवडणूक लढवली. यामध्ये प्रभाग 10 मध्ये अक्षय जरग यांनी विजयी झाले.
पण आपला उमेदवार विजयी होण्यापेक्षा इतर पक्षातील कोणाला विजयी करायचे आणि कोणाला पराभूत करायचे हे मात्र जनसुराज्य शक्ती पक्षाने ठरविल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे हा पक्ष काँग्रेस आणि भाजप या दोन्हीची 'बी टीम'च ठरली. प्रभाग आठमध्ये काँग्रेसचे प्रशांत खेडकर यांना 6023 मते मिळाली. अवघ्या 363 मतांनी ते विजयी झाले, तेथे 'जनसुराज्य'च्या रमेश खाडेंनी 5506 मते घेतली. येथे भाजपला पराभूत करण्यात जनसुराज्य शक्ती महत्त्वाची ठरली.
याच्याउलट स्थिती प्रभाग अकरामध्ये झाली. तेथे 'जनसुराज्य'च्या रमा पचरेवाल यांनी 1403 मते घेऊन काँग्रेसच्या यशोदा आवळेंना मागे खेचले. येथे भाजपच्या निलांबरी साळोखे विजयी झाल्या. दोन्ही ठिकाणी कोणाला तरी पराभूत किंवा विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका जनसुराज्य शक्तीने बजावली.
जनसुराज्यच्या उमेदवारांमुळे 8, 13, 14, 17, 19 या प्रभागांत काँगेसचे एकूण 7 उमेदवार विजयी होण्यास मदत झाली. तसेच महायुतीच्या एकूण 9 उमेदवारांना त्यांचा फायदा झाला. जनसुराज्य शक्तीमुळे भाजपच्या 5, शिवसेनेच्या 3 आणि राष्ट्रवादीची 1 जागा विजयी झाल्या. प्रभाग 10, 11, 13, 14 मध्ये भाजपच्या 5 उमेदवारांना याचा फायदा झाला.
प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 मध्ये एकूण 3 शिवसेनेच्या उमेदवारांना याचा फायदा झाला. राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 10 मध्ये माजी नगरसेवक नियाज खान 1755 मतांनी विजयी झाले. त्यांच्या गटात 'जनसुराज्य'च्या शेखर जाधव यांनी 3415 मते मिळवली. येथे जनसुराज्य शक्तीची मते निर्णायक ठरली. एकेकाळी महापौरसुद्धा जनसुराज्य शक्तीचा होता. आता मात्र केवळ एका जागेवर पक्षाला समाधान मानावे लागले.
50 टक्के उमेदवारांची डिपॉझिट जप्त :
प्रभाग 19 मध्ये भाजपचे (BJP) राहुल चिकोडे यांचा 41 मतांनी पराभव झाला. त्यांच्या प्रभागात जनसुराज्य शक्ती पक्षाचे सुभाष रामुगडे यांना 1740 मते मिळाली आहेत. त्यामुळे तेथेही जनसुराज्य शक्ती बी टीम ठरली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी 14 म्हणजे 50 टक्के उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाले.
महापालिकेच्या 81 जागांसाठी 327 उमेदवार रिंगणात होते. विजयी सर्व व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम संबंधितांना परत मिळणार आहे. रिंगणातील 327 पैकी 81 जणांची विजयी झाल्याने अनामत वाचली, तर पराभूत होऊनही 119 जणांनी आपली अनामत वाचवली आहे. अनामत जप्त झालेल्या अन्य उमेदवारांत शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
आम आदमी पक्षाने 14 उमेदवार रिंगणात उतरले होते, यापैकी 11 जणांची अनामत जप्त झाली. महापालिकेच्या यापूर्वीच्या राजकारणात सत्तेत असलेल्या, पण यावेळी अचानक मैदानात उतरलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 26 पैकी 14 उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. महापालिकेच्या रिंगणात विविध प्रभागांतून 76 अपक्ष उमेदवार नशीब अजमावत होते. यापैकी तब्बल 60 जणांची अनामत जप्त झाली, तर 16 जणांनी अपेक्षित मते मिळवल्याने त्यांची अनामत वाचली.
राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 15
आम आदमी पक्ष 11
जनसुराज्य 14
वंचित आघाडी 08
लोकराज्य जनता पार्टी 05
हिंदू महासभा 04
शेकाप 02
बहुजन रिपब्लिकन पार्टी 01
एमआयएम 01
प्रहार 01
पीपल्स रिपब्लिकन पार्टी 01
ओबीसी बहुजन आघाडी 01
अपक्ष 60
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.