Maharashtra Health Minister Prakash Abitkar  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News: आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात बनावट टोळी आली? खासगी दवाखाना, मेडिकलवर धाड टाकून गेली

Kolhapur News: कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अशी कोणतीच कारवाई केली नसल्याचं सांगण्यात आलं असलं तरी या गोष्टी सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन महिला व एक पुरुषाने खाजगी दवाखान्यात एन्ट्री करून अधिकारी असल्याचे सांगत धाडी टाकल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, कोल्हापूर विभागाच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अशी कोणतीच कारवाई केली नसल्याचे सांगितले आहे. तीन महिला आणि काही पुरुषांचा सहभाग असलेल्या टोळीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

राधानगरी तालुक्यातील धामणी खोऱ्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हासुर्ली येथे शनिवारी दुपारी खासगी दवाखाने आणि मेडिकल दुकानांमध्ये अचानक काही अनोळखी व्यक्तींनी पाहणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या तीन महिला आणि काही पुरुषांनी गावातील खासगी दवाखाने तसेच मेडिकल दुकानांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या वैद्यकीय शिक्षणासह विविध बाबींवर प्रश्न विचारल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या व्यक्तींनी मोबाईलच्या माध्यमातून दवाखाने आणि मेडिकल दुकानांचे चित्रीकरणही केले. दवाखान्यातील वैद्यकीय कचरा, डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता यासह विविध मुद्द्यांवर त्यांनी माहिती घेतल्याचे समजते. मात्र, या व्यक्तींनी आपली ओळख स्पष्ट केली नाही. कोणतेही अधिकृत ओळखपत्र दाखवले नसल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नेमके हे लोक कोण होते? ते कोणत्या विभागाच्या आदेशाने आले होते? त्यांना तपासणीचे अधिकार होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत बोगस डॉक्टर शोधमोहीम राबविण्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर म्हासुर्लीत अशा प्रकारे अचानक पाहणी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघातच बोगस डॉक्टर शोधण्याच्या नावाखाली अशा पद्धतीने पाहणी झाली असेल, तर अधिकृत यंत्रणेला याची माहिती होती का? आणि माहिती नसेल तर अनोळखी व्यक्तींनी दवाखान्यांमध्ये प्रवेश करून चित्रीकरण करण्याचे धाडस कसे केले? असा सवाल उपस्थित होतं आहे.

याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी, अशा प्रकारची कारवाई जिल्ह्यात कुठेही झालेली नाही. जिल्ह्यात असे प्रकार घडत असतील तर त्यांनी त्या व्यक्तींकडे अधिकृत ओळखपत्रे मागावित. ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना चौकशीपासून रोखावे आणि संशयास्पद व्यक्तींची माहिती आरोग्य विभागासह पोलिसांना द्यावी. आरोग्य सभापती नांदेकर यांनी प्रशासनाला बोगस डॉक्टरांचा तात्काळ शोध घ्यावा असे आदेश दिल्यानंतर काहीं समाजकंटक त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया पिंपळे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT