

Sambhaji Nagar: तीन अपत्ये, अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण आणि अतिक्रमणास प्रोत्साहन देणे अशा गंभीर कारणांवरून अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या १८ नगरसेवकांविरोधात आज आयुक्तांसमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी अनेकांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार संतापले आहेत.
महापालिका निवडणुकीनंतर एमआयएमचे १८, भाजपचे ६ आणि शिवसेनेच्या एका अशा एकूण २५ नगरसेवकांविरोधात महापालिकेच्या निवडणूक विभागात अपात्रतेच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने प्राथमिक चौकशी करत या नगरसेवकांना नोटीसा बजावल्या. त्यावर १७ ऑगस्टला ९ जणांची सुनावणी घेण्यात आली होती.
त्यानंतर सोमवारी ९ जणांच्या संदर्भात सुनावणी झाली. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत नगरसेवकांनी अभ्यासासाठी वेळ मागून घेतला होता. तसाच प्रकार सोमवारच्या सुनावणीत देखील घडला. युक्त अमोल येडगे यांच्या कक्षात उपायुक्त विकास नवाळे व अपर्णा थेट यांच्या उपस्थितीत नगरसेवकनिहाय स्वतंत्र सुनावणी घेण्यात आली.
अनधिकृत बांधकामाचा आरोप असलेल्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी प्रशासकीय नोटीस मिळण्यापूर्वीच स्वत:हून बांधकामे पाडून घेतले. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच इतर नगरसेवकांच्या अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांनीच चौकशी अहवाल दिलेला आहे. त्यामुळे पुरावे स्पष्ट असताना नगरसेवकांना वेळ देण्याची गरज काय? असा प्रश्न तक्रारदारांकडून केला जात आहे.
सुनावणीसाठी नगरसेवक व तक्रारदार यांना सोबतच बोलविले जात आहे. सोमवारी एमआयएम पक्षाच्या एका नगरसेवकाचे समर्थक व तक्रारदाराचे समर्थक महापालिका आयुक्तांच्या दालनासमोरच समोरा-समोर आले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.
सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये तीन अपत्य प्रकरणात नोटीस बजावण्यात आलेल्या फिरोज खान, मोइनुद्दीन खान, शेख नर्गीस सलीम, मो. वसीम अलीम अहेमद यांचा तर अतिक्रमणास प्रोत्साहन देणे या कारणामुळे नोटीस मिळालेल्या नगरसेवकांमध्ये मो. वाजेद मो. अय्युब, मेराज खान जलील खान यांचा समावेश होता. तर अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस दिलेल्या नगरसेवकांमध्ये सय्यद सोहेल सय्यद महेमूद हसन, अब्दुल समीर अब्दुल साजेद, भारती सोनवणे, जीवाकपाल हिवराळे यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.