Shahu Maharaj Chhatrapati, Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : ते घडलं नव्हतं घडवलं होतं? शाहूंना अंदाज आला, पाटलांचा स्व‍कीयांनी घात केला

Kolhapur North Assembly Election 2024 : गेले या पंधरा दिवस काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या की घडवल्या? गेल्याचा फटका कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात बसला आहे. ऐनवेळी उमेदवारी डावल्याने राजेश लाटकर यांनी बंडाचे निशाण फडकावले आणि खासदार शाहू महाराजांनी मधुरिमाराजे यांची उमेदवारी मागे घ्यायला लावला.

Rahul Gadkar

Kolhapur News, 05 Nov : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात (Kolhapur North Assembly Constituency) काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला. अवघ्या शेवटच्या क्षणी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसने ते सतेज पाटील या प्रकारामुळे चांगलेच संतापलेले दिसले.

खासदार शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) देखील कार्यकर्त्यांवर भडकले. गेल्या पंधरा दिवसांपासून काँग्रेसमधील सुरू असलेली धुसफूस मधुरिमाराजे छत्रपती यांच्या राजीनाम्यानंतर शांत झाली. माघारीचा धक्का सहन न झाल्याने सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा राग आणि अश्रू अनावर होणे हे साहजिकच आहे.

कारण कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात महायुतीला ते एकाकी झुंज देत आहेत. मात्र, गेले या पंधरा दिवस काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या की घडवल्या गेल्या? त्याचा फटका कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात बसला आहे.

ऐनवेळी उमेदवारी डावल्याने राजेश लाटकर यांनी बंडाचे निशाण फडकवले, शिवाय कट कारस्थानाचं बिंग लाटकर यांनी महाराजांसमोर फोडल्याने खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचं सांगितलं जात आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? याबाबत अनेक दिवस उत्कंठा लागून राहिली होती. अखेर काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाली. त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता असणारा राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचीच उमेदवारी कोल्हापूर उत्तर काँग्रेसला कलाटणी देणारी ठरली. राजकारणातील काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीवर दगडफेक झाली.

लाटकर यांना उमेदवारी दिल्यानंतर इच्छुकांमधील ही पहिली ठिणगी होती. एकीकडे राज्याचं नेतृत्व करायला निघालेल्या सतेज पाटील यांच्या नेतृत्वावरील हा पहिला डाग होता. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी लाटकर यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी घेत 27 नगरसेवक सतेज पाटलांना (Satej Patil) भेटले.

या 27 नगरसेवकांमध्ये कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिणमधील नगरसेवक होते. लाटकर यांच्या उमेदवारीवर राजीनामा अस्त्र नगरसेवकांनी वापरले होते. कारण दक्षिणेतील काही नगरसेवक हे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. स्व‍कीयांनी टाकलेला हा पहिला डाव होता. तर उत्तरमधील काही नगरसेवकांनी थेट लाटकर यांना विरोध केला.

दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची होत असलेले अडचण पाहून अखेर उमेदवारीचा निर्णय बदलावा लागला. ही होती काँग्रेस मधली दुसरी ठिणगी. महिनाभरापूर्वी काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना विश्वासात घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारी बदलणार असल्याचे सांगण्यात आले होते. लाटकर यांचे नाव समोर आल्यानंतर जाधव यांनी देखील त्याला सहमती दर्शवली होती.

मात्र, काँग्रेस नगरसेवकांच्या दबावामुळे मधूरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर नाराज झालेल्या आमदार जाधव यांनी काँग्रेसला राम राम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

ही काँग्रेस मधील तिसरी ठिणगी होती. सामान्य कार्यकर्ते राजेश लाटकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या लाटकर यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रीय सेवा दलाचे पाईक असल्याने लाटकर हे नेहमी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारसरणीचे राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी माघार घ्यावी यासाठी मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते.

शनिवारी खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, आणि काँग्रेसच्या उमेदवार मधुरीमाराजे छत्रपती लाटकर यांची मनधरणी करण्यासाठी गेले होते. मात्र लाटकर यांनी लढण्याचा ठाम निर्णय व्यक्त केला.

या संपूर्ण घडामोडी पाहता सुरुवातीला विधानसभा निवडणुकीसाठी मधुरिमाराजे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी करण्यात आली होती. त्यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा देखील केली होती.

मात्र मधुरिमाराजे यांच्याकडून नकार आल्यानंतर राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे देखील कोल्हापूर उत्तरच्या मैदानातून इच्छुक होते.

मात्र 27 नगरसेवकांचे पत्र घेऊन लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला. हे करण्यामागे काही कारभाऱ्यांचा आणि नेत्यांचा हात असल्याचा आरोप लाटकर यांनी केला. लाटकर यांचा रोख थेट माजी आमदार मालोजीराजे यांच्याकडे असल्याचे दिसून आले. तर काही नगरसेवकांच्या खोट्या सह्या घेऊन पत्रक दिल्याचा दाखला, शाहू महाराज छत्रपती यांच्यासमोर लाटकर यांनी दिला.

एकंदरीतच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच उमेदवारी चालून आली असे दाखवण्याचा प्रयत्न काही कारभाऱ्यांचा होता. मात्र लाटकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कारभाऱ्यांची बिंग फुटले अन् कट कारस्थान उघड झाले.

त्याबाबत खासदार शाहू महाराजांना देखील कल्पना नसल्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लाटकर यांनी अर्ज माघार घेण्याची वाट पाहिली. मात्र लाटकर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीच मधुरीमाराजे छत्रपती यांना माघार घेण्यास भाग पाडले.

जिल्ह्यात महायुतीला एकाकी झुंज देणारे सतेज पाटील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणामुळे आज बॅकफूटवर गेले. स्व‍कीयांनीच त्यांचा घात केला. जिल्ह्यातील सर्वच नेते त्यांचा एक हाती नेतृत्व मानत असताना त्यांच्याच नगरसेवकांनी त्यांना बंडाचे निशाण दाखवले. शिवाय सतेज पाटील यांनी देखील नगरसेवकांना गृहीत धरूनच चाल खेळल्याने उमेदवार बदलण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.

मात्र मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणुकीतूनच माघार घेतल्याने सतेज पाटील यांचा संताप पाहायला मिळाला. साहजिकच त्यांचा हा संताप व्यर्थ म्हणावा लागेल. कारण जागा मिळवण्यापासून त्यांचा संघर्ष सुरू होता. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी सर्व राजकीय ताकद पणाला लावली होती. शिवाय त्यांच्याच कारभारी नगरसेवकांनी या कट कारस्थानापासून गाफील ठेवले होते.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही जागा आणण्यासाठी आणि उमेदवारी देण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास अत्यंत गुप्त होता. सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यापासून ते त्यांची उमेदवारी रद्द करण्यापर्यंत अनेक कार्यकर्त्यांच्या टिकीचे धनी ते ठरले होते.

मात्र मधुरीमाराजे छत्रपती यांच्या माघारीनंतर आता उत्तरच्या मैदानात कोणता डाव टाकतात. यावरच सर्व गणितं अवलंबून आहेत. दुपारी त्यांचा संताप पाहायला मिळाला, तर रात्री त्यांनी केलेल्या कष्टामुळे अश्रू पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT