Hasan Mushrif, Samarjit Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kagal Assembly Election 2024: मुश्रीफांच्या प्रतिष्ठेची लढाई; मित्राच्या पराभवासाठी सतेज पाटील कोणती यंत्रणा लावणार?

Rahul Gadkar

kolhapur Politics: गेले 25 वर्ष कागल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या प्रतिष्ठेची यंदाची निवडणूक होत चालली आहे.

मुश्रीफ यांनी महायुतीत एन्ट्री केल्यानंतर भाजपनेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी फुंकली आहे. एकास एक लढत होत असतानाच मंडलिक गटाने देखील उमेदवारीवर दावा केला आहे.

महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार रिंगणात उतरला आहे. कागलच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. घाटगे यांच्याकडून ही लढत थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीफ अशी केली जात आहे. मात्र विकास कामाच्या जोरावर मुश्रीफ हे मैदान मारू शकतात. असा अंदाज आहे. त्यामुळे पागल मधील निवडणुकी घाडगे विरुद्ध मुश्रीफ अशी काटाजोड होणार असून निकालानंतरच कोण आमदार होणार? हे कळणार आहे.

कागलचा श्रावण बाळ म्हणून पालकमंत्री हसनमुश्रीफ यांची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा आमदारांमध्ये विकास काम खेचून आणण्यासाठी मुश्रीफ यांची आघाडी आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री असून देखील मुश्रीफ यांना स्वतःच्या मतदारसंघात अडकून राहण्याची वेळ आली आहे.

गेल्यावर्षींचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक हे मातब्बर नेते पाठीशी असून देखील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार समरजीत घाटगे यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे.

मात्र माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी नुकताच मेळावा घेत मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि गोकुळ दूध संघातील निवडणूक यांचा राग मंडलिक यांच्या गटात आहे. त्यामुळे यंदा ही धुसफूस त्यानिमित्ताने बाहेर येऊ शकते. आजपर्यंत कागलच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यास त्याचा फायदा मुश्रीफ यांना झाला आहे. मात्र यंदाचे चित्र वेगळे आहे.

वीरेंद्र मंडलिक यांच्या मेळाव्यानंतर मंडलिक गटाचा रोष मुश्रीफ यांच्यावर दिसून येतो. कदाचित महायुतीचा हा बी प्लॅन असू शकतो असाही राजकीय अंदाज आहे. मंडलिक गटाची नाराज मते घाटगे यांना मिळण्यापेक्षा ती मंडलिक यांना मिळावी, अशी खेळी सुद्धा यामागे असू शकते. कारण माजी खासदार संजय मंडलिक हे मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर जाऊन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करताना दिसतात.

मुश्रीफ यांची मतदारसंघावर पकड आहे, मात्र मंडलिक गटाच्या मतांना वगळणे त्यांना परवडणारे नक्कीच नाही. त्यामुळे त्यांची चाल कशी असेल, हे लवकरच स्पष्ट होईल. शिवाय खासदार धनंजय महाडिक यांच्या युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनीही मुश्रीफांच्या कारभारावर आरोप केलेत.

गेल्या दहा वर्षापासून समरजितसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेशी सततचा संपर्क ठेवला आहे. मागील पाच वर्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मतदारसंघात विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला आहे.

लोकसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि घाटगे एकत्र दिसले असले तरी त्यांच्या विरोधातील धार त्यांनी अजिबात कमी केलेली नाही. गेल्या पाच वर्षांत त्यांनी टीकाटिप्पणी ऐवजी कागल विधानसभा मतदारसंघातील विकासकामाचे व्हीजन त्यांनी जनतेसमोर मांडले आहे.

मुश्रीफांच्या विरोधात त्यांनी तोडीस-तोड आव्हान उभे केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे शरद पवार, सतेज पाटील, समरजितसिंह यांच्यासाठी जोडण्या कशा लावणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाटगे यांच्या पराभवासाठी कोणती रचना आखणार ? मित्राच्या पराभवासाठी सतेज पाटील कोणती यंत्रणा लावणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव कसा राहणार, यावर विधानसभेच्या निकालाची दिशा ठरणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT