कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणात अनपेक्षित घडामोड घडली असून प्रभाग क्रमांक नऊमधील निकालाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शारंगधर देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धक्का दिला. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले आणि आमदार सतेज पाटील यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे देशमुख यांनी आता वेगळा राजकीय मार्ग निवडून यश खेचून आणले आहे.
या लढतीत देशमुख यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा सुमारे 3 हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे हा निकाल ‘जायंट किलर’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे राहुल माने हे सतेज पाटील यांचे विश्वासू मानले जात होते. पाटील यांनी स्वतः या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. तरीही अपेक्षित निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही.
प्रभाग क्रमांक नऊची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली होती. कारण शारंगधर देशमुख हे कधी काळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. महापालिकेत काँग्रेसची रणनीती राबवताना त्यांची भूमिका निर्णायक राहिली आहे. जवळपास दहा वर्षे काँग्रेसचे गटनेतेपद त्यांच्याकडे होते. पक्षातील आघाडी सांभाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा प्रभाव आणि संघटन कौशल्य सर्वश्रुत होते.
मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान कोल्हापूर उत्तर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने देशमुख नाराज झाले. या नाराजीमुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत काही आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुक कार्यकर्तेही शिवसेनेत सहभागी झाले. यामुळे स्थानिक समीकरणे पूर्णपणे बदलली.
निवडणूक प्रचारात देशमुख यांनी विकास, स्थानिक प्रश्न आणि संपर्कावर भर दिला. तर दुसरीकडे काँग्रेसकडून संघटन आणि जुन्या निष्ठांवर विश्वास ठेवण्यात आला. मात्र मतदारांनी बदलाला पसंती दिली. शेवटी मतमोजणीअंती देशमुख यांच्या नावाची आघाडी वाढत गेली आणि निकाल स्पष्ट झाला.
या विजयानंतर कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. सतेज पाटील यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक ठरला असून शिंदे गटासाठी मात्र हा मोठा आत्मविश्वास वाढवणारा विजय मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.