Ajara Sugar Factory Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajara Sugar Factory Election: 'आजरा'च्या निवडणुकीत 'यू टर्न' घेतलेली राष्ट्रवादी अशी ठरली 'गेमचेंजर' !

Rahul Gadkar

Kolhapur News: आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जागा वाटपावरून नाराज झालेल्या राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली. भाजप काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या माघारीवरून त्यांना डिवचले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आजरा लढवणारच असा चंग बांधला. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इर्षेला पेटले. प्रचाराला सुरुवात झाली. प्रचार संपला आणि मतदान झाले. मंगळवारी मतदान पार पडले आणि सत्ताधारी मंडळाला राष्ट्रवादीने धक्का दिला.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र असलेले हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील हे आजरा कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात होते. मुश्रीफांची सेना एकटी राहून आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या पॅनेलला धक्का दिला.

आजरा साखर कारखान्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांनी एकजूट करत विजयाचा झेंडा फडकवला. राष्ट्रवादीच्या रवळनाथ शेतकरी आघाडीने 19 जागा मिळवत निखळ विजय मिळवला. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, कॉंग्रेस व दोन्ही सेना गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी निवडणूक पार पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आर्थिक संकटात सापडलेल्या आजरा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी जिल्ह्यातील नेतेमंडळीकडे साकडे घातले होते. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या वाट्याला जागा येत नसल्याने राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी नाराजी व्यक्त करत रिंगणातून माघार घेतली.

दरम्यान, भाजप, कॉंग्रेस, सेना यांनी एकत्रित येत पॅनेल रचना केली. याला आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांनी हिरवा कंदील दाखवला. पण ऐनवेळी राष्ट्रवादीच्या तालुक्यातील प्रमुखांनी हसन मुश्रीफ यांना निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या 'यू टर्न'मुळे तालुक्याची राजकीय समीकरणे बदलली.

राष्ट्रवादीसोबत असलेल्या ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांनी अशोक चराटी, जयवंत शिंपी गटाशी युती केली. तिघांच्या युतीमधील एकजीनसीपणा निवडणुकीत दिसला नाही.

निवडणूक बिनविरोध होणार असा होरा नेत्यांचा राहिल्याने विरोधी आघाडी सक्षम पॅनेल रचना करू शकली नाही. गत निवडणुकात व कारखाना सभेत एकमेकांवर आरोप केलेले विरोधी आघाडीतून एकत्र लढले. याचा परिणामही निवडणुकीत झाला.

राष्ट्रवादीने माघारीचे धक्कातंत्र वापरले. मात्र, पॅनेल रचना भक्कम केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पाटील यांनी निवडणूक हातात घेतली. हिवाळी अधिवेशन असतानाही मुश्रीफ व पाटील यांनी विमानाने प्रवास करून निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला. तालुक्यातील बहुतांश गावात पदयात्रा काढली. आजरा व उत्तूर येथे सभा घेऊन वातावरण तयार केले.

विरोधी आघाडीच्या नेतेमंडळीच्या सभा झाल्या नाहीत. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी एक दिवस प्रचारासाठी दिला. मात्र, त्यांचा मतदारांवर फारसा प्रभाव पडला नाही. जिल्हा बॅंकेचे संचालक सुधीर देसाई यांनी पॅनेलची रचना शिताफीने करत राजकीय मुरब्बीपणा दाखवला. बिद्रीच्या निवडणुकीनंतर के.पी.पाटील यांनी प्रचारात सहभाग घेऊन उत्साह वाढवला.

मतदारांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरल्याने विजयाला झळाळी मिळाली. कारखाना कर्जमुक्त करावयाचा असेल तर राष्ट्रवादी (NCP) शिवाय पर्याय नाही, असे मतदारांना ठसवण्यात राष्ट्रवादीला यश मिळाल्याचे निकालातून दिसते.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT