Kolhapur News: कोल्हापूरच्या विकास कामावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना झापलं होतं. 100 कोटी रस्त्याच्या कामावरून 'वर्क ऑर्डर' 11 टक्के कमिशनसाठी थांबली का ? असा सवाल करत अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली होती.
त्यावरून अधिकारी खडबडून जागे होऊन तात्काळ 'वर्क ऑर्डर' देण्यात आली. मात्र, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांनाच गोंजारण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱ्यांचीच पाठराखण करून त्यांच्या चुकावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरातील विविध विकास कामासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त के मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहरअभियंता हर्षजित घाटगे, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत रोजंदारी कर्मचारी 100 कोटी रस्त्यांच्या कामावर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरात अंतर्गत रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांची 'वर्क ऑर्डर' नुकतीच मंजूर करण्यात आली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर ही ऑर्डर देण्यात आली आहे. मागणी करण्यापासून ते काम मंजूर करण्यापर्यंत आणि त्याची'वर्क ऑर्डर' देण्यापर्यंत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विनाकारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बिनबुडाचे आरोप करू नयेत, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, अधिकाऱ्यांवर सामान्य नागरिकांचा रोष आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या प्रश्नावर मात्र राज्यात क्षीरसागर यांनी, अधिकाऱ्यांची पाठराखण केली. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या मनुष्यबळ कमी आहे. त्याचा ताण अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर पडत आहे. त्यामुळे अधिकारी काहीच करत नाहीत, असे म्हणणे योग्य नाही. अशा शब्दात त्यांच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम क्षीरसागर यांनी केली.
खरे तर राजेश क्षीरसागर यांनी विकास कामात होणाऱ्या दिरंगाईबद्दल अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी, अशी अपेक्षा होती. शहरात कचऱ्याचा प्रश्न वाऱ्यावर सोडला आहे. तर पाणी नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मात्र, या विषयावर न बोलता त्यांनी 100 कोटींच्या रस्त्यांवर चर्चा करण्यास महत्त्व दिले. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना गोंजारण्याचे काम केले, हे नवलच म्हणावे लागेल.
'सरकार बदलते अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे...'
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका अधिकाऱ्यांची खरडपट्टी केल्यानंतर त्यावर आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी देखील प्रतिक्रिया दिली. शंभर कोटी रस्त्यांची 'वर्क ऑर्डर' वेळेत येणे अपेक्षित होते. मात्र, अधिकाऱ्यांच्यावर कोणाचा दबाव होता. कोणाच्या दबावाला बळी पडून लोकांना वेटीस धरत असतील तर अधिकाऱ्यांच्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे. पण अधिकाऱ्यांनी सरकार बदलल्यानंतर अधिकारीही बदलता येतो, हे लक्षात ठेवावे, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.
कोल्हापुरातील विकास कामावरून आरोपांच्या पिंजऱ्यात उभा केलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली होती. झूम प्रकल्प येथे झालेल्या कार्यक्रमात आयुक्त के मंजूलक्ष्मी यांना भर कार्यक्रमात झापले होते. मंजूर असलेली कामे तातडीने का पूर्ण केली नाही? रस्ते प्रकल्पाचे काम कमिशन मिळालं नाही म्हणून थांबले का ? 11 टक्केवरून काम थांबले असल्याचे माझ्या कानावर आले आहे.
येत्या चार दिवसांत हा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळला बदला असा सज्जड दम पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला होता. आयुक्तांना आयुक्त होण्यात इंटरेस्ट आहे का ? जिल्हाधिकारी होण्यात इंटरेस्ट आहे, हे मला माहिती नाही. पण जिल्हाधिकारी ते होणार नाहीत, असेही मुश्रीफ यांनी आयुक्त के लक्ष्मी यांना खडसावले.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.