Kolhapur Politics : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देत बैठक घेण्यात आल्यानंतर इंडिया आघाडीकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांचा खास शैलीत समाचार घेतला आहे.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज इंडिया आघाडीची बैठक काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर पार पडली. त्यावेळी इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर थेट टीका केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे प्रगतशील शेतकरी तयार झालेत. त्यांनी कधी टॅक्टर चालवला नाही. यांनी कधी शेतात नांगर फिरवला नाही, असा टोला इंगवले यांनी लगावला आहे.
जे कधी भाजी, भुईमूग लावायला चिखलात गेले नाहीत, असे प्रगतशील शेतकरी राजेश क्षीरसागर आहेत. अशा या शेतकऱ्याने शक्तिपीठ महामार्ग आणि अलमट्टी प्रश्नात उडी घेतली आहे. यांना कसले ज्ञान नाही. त्यांनी यात सुपारी घेऊन उडी मारली असल्याचा आरोप इंगवले यांनी केला.
माझ्या प्रतिक्रियेनंतर त्यांनी स्वतः प्रत्युत्तर द्यावे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या पक्षात असणारे शक्ती कपूर, अमरीश पुरी, गुलशन ग्रोव्हर त्यांनी उत्तर देऊ नये. मला स्वतः गब्बरसिंग हवा आहे. अशा शब्दांत इंगवले यांनी क्षीरसागर यांना आव्हान दिले आहे.
राजेश क्षीरसागर हे वैज्ञानिक देखील आहेत. कोल्हापुरातील गांधी मैदान येथे पाणी साचल्यावर त्यांच्याकडून गादी, चटई टाकून पाणी ठेवण्यात आल्याचा शोध त्यांनी लावला. माझी कर्नाटक सरकारला विनंती आहे. कोल्हापुरात देखील एक वैज्ञानिक आहे, त्यांचे नाव क्षीरसागर आहे. गाद्या, चटई, रगा टाकून धरण बांधता येते. कर्नाटक सरकारला विनंती आहे की, कोल्हापुरातील या वैज्ञानिकाचा सल्ला घ्यावा. त्यांची फी कमी आहे. कमी फी मध्ये ते काम करतात. ते कोल्हापूरच्या जनतेने पाहिलं असल्याची टीका इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर केली.
माझी क्षीरसागर यांना विनंती आहे की, त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक चुकीची मांडणी करत आहात. 2019 ला महापूर आला होता. त्यावेळी कोल्हापूरची अवस्था काय झाली, हे कोल्हापूरकरांनी पाहिले आहे. महापुराने कोल्हापूरला वेढले असताना देखील पाण्याची टंचाई होती. रेड झोन असताना या महाशयाने काय काय केलं? हे कोल्हापूरला माहिती आहे. नजरचुकीने क्षीरसागर ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेत, आता त्यांनी थांबावे. त्यांच्या भूमिकेमुळे कोल्हापूर शहरात पाणी आलं तर आम्ही राजेश क्षीरसागर यांना जबाबदार धरू, असा इशारा जिल्हाप्रमुख इंगवले यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.