Congress News  Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress News : कोल्हापूर दक्षिणेत महाडिक गटाला खिंडार; गांधीनगरच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य लागले पाटील गटाच्या गळाला

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक गटतट सक्रिय झाले आहेत. अनेक जण इकडून तिकडे अशा राजकीय वाऱ्या करत सोयीस्कर राजकीय भूमिका घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक कोलांटउड्या पाहायला मिळत आहेत. आगामी विधानसभा तोंडावर असतानाच अनेकांनी गटतट फोडण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर दक्षिणमध्ये ही महाडिक गटाला पाटील गटाने खिंडार पाडले आहे.

विधानपरिषदेचे काँग्रेसचे (Congress) गटनेते आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीनगर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी, राजू चंदनशिवे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधीनगरमधील सिंधी सेंट्रल पंचायत या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आमदार सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, या सर्वांनी अन्याय आणि अविश्वासाच्या वातावरणाला फाटा देत विश्वासाच्या वातावरणात पदार्पण केले आहे. आम्ही पद प्रतिष्ठा मिळवली नाही, तर जीवाभावाची माणसं मिळवली.

सामान्य माणसांमुळेच आज बंटी पाटील जिवंत आहे. आजपर्यंत एक माणूस आम्हाला कधी सोडून गेला नाही. सत्ता नसतानाही लोक आमच्या गटात सहभागी होत आहेत, याचं विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला आमदार पाटील यांनी महाडिक गटाला लगावला.

आमदार ऋतुराज पाटील यांनी, पक्षप्रवेश हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढवता येईल, ही आमच्या कामाची पद्धत आहे. आम्ही गट तट न मानता विकास कामाला महत्त्व देतो.

आज पक्ष प्रवेश करणाऱ्यांनी मागील 18 वर्षे कटू अनुभव घेतला आहे, यापुढे त्यांना अभिमान वाटेल असा अनुभव येईल. यापुढे गावचा विकास कसा करता येईल यावर भर देण्यात येईल. गांधीनगर रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT