कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची लगबग सध्या सुरू आहे. भाजपने सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashri Jdhav) मैदानात आहे. पण या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर चर्चा सुरू आहे ती भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोळा महिन्यांपूर्वी केलेल्या एका वक्तव्याची. याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
कोथरूडमधील आमदारकीला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन २ नोव्हेंबर २०२० रोजी झाले. त्या वेळी बोलताना पाटील यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं होतं. कोल्हापूरात पळून आल्याचा टोला विरोधकांकडून सातत्याने लगावला जातो, असा संदर्भ देत पाटील यांनी कोथरूडमधून निवडणूक लढण्याचा किस्सा या कार्यक्रमात सांगितला होता. पुण्यात सुरक्षित म्हणून नव्हे तर पक्षाने सांगितले म्हणून आलो. माझी कोल्हापूर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी होती. पक्षाच्या आदेशानुसार मी पुण्यात लढण्यासाठी आलो, असे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.
मी कोल्हापूरमधील मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आजही तयार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवेल. मला हरणे माहीत नाही. निवडून नाही आलो तर हिमालयात निघून जाईल, अशा शब्दांत पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिलं होतं. सोळा महिन्यांपूर्वीचं हे दादांचं हे भाषण आता व्हायरल होत आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू असल्याने सोशल मीडियात या भाषणाची चर्चा रंगली आहे.
क्षीरसागर यांची तलवार म्यान
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. तुम्ही कामाला लागा, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी (ता. २१ मार्च) दुपारी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांना दिला. त्यामुळे उद्यापासून (ता. २२ मार्च) क्षीरसागर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा प्रचार करणार आहेत. आघाडीच्या नेत्याच्या मुंबईतील बैठकीत हे आदेश दिले. त्यामुळे क्षीरसागर यांची खदखद आता दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी क्षीरसागर यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही जागा काँग्रेसला सोडल्याचे जाहीर केले. त्यामुळे क्षीरसागर नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला गैरहजर राहून दाखवून दिली होती. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी २०२४ ला ही जागा शिवसेनेची असेल, असे जाहीर केले होते. मात्र, याचवेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज त्यांना मुंबईत बोलविले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.