Police investigate the residence in Kolhapur where a young woman was found dead ahead of her infant's naming ceremony. The case has sparked allegations of dowry harassment. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Crime : पोटच्या लेकीच्या बारशादिवशी आईने जीवन संपवलं; 52 हजारांचा पाळना, मुलाचे कपडे घेतले अन् मुलगी झाली म्हणून सासरच्या लोकांनी...

Kolhapur Woman Death : राजारामपुरी येथे राहणाऱ्या अस्मिता प्रतीकसिंह काटकर यांनी रविवारी (ता. १२) दुपारी राहत्या घरी फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. अस्मिताचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता.

Jagdish Patil

Kolhapur News, 13 Jul : पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेल्या कोल्हापूर शहराला हादरवणारी घटना राजारामपुरी परिसरात घडली आहे. अवघ्या एका महिन्याच्या चिमुकलीच्या बारशाचा आनंद साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच तिच्या आईने गळफास घेतल्याची घटना समोर आली.

मात्र, हा आत्महत्येचा प्रकार नसून आपल्या मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप मृत विवाहितेच्या आई-वडिलांनी सासरच्या चौघांवर केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी येथे राहणाऱ्या अस्मिता प्रतीकसिंह काटकर यांनी रविवारी (ता. १२) दुपारी राहत्या घरी फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. अस्मिताचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. या चिमुकलीच्या बारशाचा कार्यक्रम होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण आणि तयारी सुरू होती.

मात्र, बारशापूर्वीच घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. लग्न झाल्यापासून पैशांसाठी अस्मिताचा सातत्याने मानसिक छळ करण्यात येत होता. अनेक वेळा त्यांच्या मागणीनुसार पैसे देण्यात आले होते.

बारशासाठी तब्बल ५२ हजार रुपयांचा पाळणा ऑनलाइन मागविण्यात आला होता. तसेच बारशाचा खर्च आणि इतर कार्यक्रमांसाठीही तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. याशिवाय, बाळंतपणापूर्वीच सासरच्या लोकांनी मुलगा होईल या अपेक्षेने मुलाचे कपडे खरेदी करून ठेवले होते. मात्र मुलगी झाल्यानंतर अस्मिताला मानसिक त्रास देण्यात आला आणि तिचा छळ करण्यात आला, असाही आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

अस्मिताशी शुक्रवारी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी तिने मुलीचे बारसे मोठ्या उत्साहात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र रुग्णालयातील खर्च आणि अधिक मासामुळे आर्थिक ताण असल्याचे आपण तिला सांगितल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. तर तिच्या आईने सासू, सासरा, पती आणि नणंद यांनीच आपल्या मुलीचा जीव घेतल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT