Local Body Elections Maharashtra Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP Election: झेडपी निवडणुकीत गोकुळ, केडीसीची फिल्डिंग, कार्यकर्त्यांच्या जीवावर नेत्यांचा पुढचा डाव

Kolhapur ZP Campaign Gokul Doodh Sangh Election: गोकुळ आणि केडीसी बँकेत सत्ता भोगणाऱ्या नेत्यांनी आपापल्या क्षेत्रात सावध भूमिका पाहिली तर पुढील निवडणुकांची जोडणी लावलेले चित्र स्पष्ट दिसत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात जितकी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक राज्यकर्त्यांसाठी महत्त्वाची आहे. तितकीच महत्वाची आणि राजकीय केंद्र म्हणून ओळखली जाणारी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ आणि कोल्हापूर जिल्हा बँक ही आहे. ज्यांच्या हाती गोकुळ आणि केडीसीची सत्ता आहे. त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे असे समजले जाते.

नगरपालिका,कोल्हापूर महानगरपालिकेबरोबर कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणुकीत देखील तितकीच महत्त्वाची मानले जाते. ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून केला जातो त्याच पद्धतीने गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या बोर्डवर आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून कार्यकर्ता किंवा घरातील व्यक्तीला संधी दिली जाते. मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्त्यांनी गोकुळच्या कारभाऱ्यांच्या नातेवाईकालाच उमेदवारी देऊन गोकुळ आणि केडीसी बँकेतील फील्डिंग लावली आहे.

गोकुळ आणि केडीसी बँकेत सत्ता भोगणाऱ्या नेत्यांनी आपापल्या क्षेत्रात सावध भूमिका पाहिली तर पुढील निवडणुकांची जोडणी लावलेले चित्र स्पष्ट दिसत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यातील राजकीय समीकरणे पाहिली तर आगामी 'गोकुळ' सह 'केडीसीसी' बँकेच्या निवडणुकीची नेत्यांनी पेरणी केल्याचे स्पष्ट होते.

महापालिकेच्या राजकारणाचा फारसा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होत नाही. पण, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या राजकारणाचे पडसाद थेट 'गोकुळ' व 'केडीसीसी' बँकेवर उमटतात. त्याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत येताना पाहायला मिळत आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुती एक संघ लढणार, असे चित्र दिसत असताना स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन महायुती स्वतंत्र लढतीच्या वाटेवर आहे. मात्र तालुकास्तरावरील एकमेकांसोबत झालेली आघाडी पाहता आगामी गोकुळ आणि केडीसी बँकेतील राजकारण डोळ्यासमोर ठेवून झालेल्या आघाडी असेच चित्र प्राथमिक टप्प्यात स्पष्ट होत आहे. करवीर, राधागरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांत सर्वाधिक दूध संस्था आहेत.

काँग्रेसने काही तालुक्यांतील अपवाद वगळता आपल्या मित्र पक्षांना सोबत ठेवत मोट बांधली आहे. काँग्रेसने काही तालुक्यांत घेतलेली पूरक भूमिका पाहता, आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील बेरजेचे राजकारण केल्याचे दिसून येत आहे. राधानगरी, भुदरगड, करवीर या तालुक्यांची भूमिका महत्त्वाची ठरते, हे ओळखूनच आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा गट काँग्रेसच्या झेंड्याखाली घेऊन आपली दिशा स्पष्ट केली.

मंत्री मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांच्या कन्येला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. डोंगळे हे गोकुळमधील महत्वाचे नेते आहेत. करवीरमध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी वापरून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या मुलाला उमेदवारी देऊन शिंदेसेनेत घेतले.

कागल तालुक्यात माजी आमदार संजय घाटगे, 'शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना सोबत घेतले. गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तालुक्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणत त्यांनी बांधणी केली आहे. शाहुवाडी मध्ये जनसुराज्य शक्ती म्हणजे आमदार विनय कोरे यांनी करणसिंह गायकवाड यांना पुरस्कृत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT