Kolhapur Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात कोल्हापूर महापालिका निवडणुकीत मात्र महायुतीत पहिल्यापासूनच जागा वाटपावरून ठिणगी पडली आहे. 2016 च्या महापालिका निवडणुकीत ज्या 34 जागा भाजप-ताराराणी आघाडीला मिळाल्या, त्या जागा सोडून उर्वरित जागावाटप व्हावे अशी भूमिका भाजपची आहे. तर मागील निवडणुकीत 4 जागा घेतलेल्या शिवसेनेने यंदा 30 पेक्षा अधिक जागांवर दावा केला आहे.
महायुती म्हणून लढत असताना राष्ट्रवादीला जमेत न धरल्याची भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. तर त्यावरूनच महायुतीतील पहिला संघर्ष उफाळलेला आहे. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच शिवसेनेला जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपसोबत संघर्ष करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीलाच भाजपकडून महापालिका निवडणुकीत 35 जागांच्या पुढे जागावाटप व्हावी अशी मागणी केली आहे. 2016 च्या निवडणुकीत भाजपने 14 आणि ताराराणी आघाडीने 19 जागा मिळवल्या होत्या. सध्या भाजप आणि ताराराणी एकत्र असल्याने हक्काच्या जागा मिळवण्यासाठी भाजपने आतापासूनच दावा केला आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 14 जागा होत्या. शिवसेनेने चार जागांवर यश मिळवले होते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीकडून 34 आणि 14 जागांवर सुरुवातीपासूनच दावा केला जात असताना शिवसेनेकडून 30 जागांचा दावा केला जात आहे. भाजपने 34, राष्ट्रवादीच्या 14 आणि शिवसेनेच्या चार जागा सोडल्या तर उर्वरित एकूण 30 जागांवर जागा वाटप करावे, अशी भूमिका भाजपसह राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे आता शिवसेना कशा पद्धतीने आपली बाजू भक्कम करणार, हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
वास्तविक महायुतीतील भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरूनच आतापासून स्पर्धा लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने काही काँग्रेसचे आणि भाजपचे नगरसेवक फोडल्याने त्या जागांवर शिवसेनेचा दावा आहे. मात्र भाजपमधील इच्छुकांची संख्या पाहता शिवसेनेला या जागा मिळवण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागणार आहे.
शिवसेनेकडून पहिल्या टप्प्यात जवळपास 35 आजी-माजी नगरसेवकसह महापौर, उपमहापौर आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. तर दुसऱ्या टप्प्यात राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून काहीजणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. अशा परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीला जागा वाटपामध्ये ठोस भूमिका घेण्यासाठी शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेमध्येच असलेल्या अंतर्गत गटबाजीवर वरिष्ठ नेत्यांची नजर असणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीला होईल, यात शंका नाही. नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश सागर यांनी महापालिका निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची जबाबदारी घेतल्याची सध्या तरी दिसते. तर दुसरीकडे संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर त्यांच्यावर सोपवलेली आहे. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. यावरील सर्व नेत्यांचा एकसंघ भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर पहिल्या टप्प्यात विजय मिळवू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.