Lahu Kanade
Lahu Kanade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लहू कानडे म्हणाले, काँग्रेस देशात असा एकमेव पक्ष की, ज्याची जपवणूक जनता करतेय...

सरकारनामा ब्युरो़

अहमदनगर : श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार असलेले लहू कानडे प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते आहेत. त्यांनी आज (गुरुवारी) अहमदनगर येथील सकाळ कार्यालयात संपादकीय टीमशी संवाद साधला. समवेत कॉंग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे उपस्थित होते. या प्रसंगी आमदार लहू कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारे संदर्भात आपली मते मांडली. Lahu Kanade said, Congress is the only party in the country which is protected by the people ...

आमदार लहू कानडे म्हणाले, काही कालावधीनंतर लोकांना बदल हवा असतो. झालेला बदल देश अनुभवतोय, मात्र 65 वर्षे काँग्रेस सत्तेवर होते. काँग्रेस समाजमनात आहे. नेत्यांसोबत लोकांनी काँग्रसचे विचार जोपासले म्हणून ते शक्य झाले. मी दोन निवडणुकाच्या तुलनेत अनुभव घेतला आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेस भक्कम आहे. साहित्यातून जेवढे लिहिले ते काम आता करत असल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.

आमदार कानडे पुढे म्हणाले, खरं तर माझा अनुभव असा आहे की, आमदार होण्यापेक्षा निवडून आल्यानंतर त्या पदाची जबाबदारी संभाळणे कठीण आहे. राजकारणात आल्यानंतर राजकारण हे जगण्याचा भाग होते, असे माझे मत असून मी त्याकडे साहित्यिक म्हणून तसाच पाहतो. मूल्यांकन पाहिले तर पूर्वीपेक्षा आजची काँग्रेस क्षीण झालेली दिसत असली तरी देशात असा एकमेव पक्ष आहे की, त्याची जपवणूक जनता करतेय.

तळागाळातील हा पक्ष जोरात उभारी घेईल. त्या दृष्टीने काम चालू आहे. ज्येष्ठांचा सन्मान, तरुणांना संधी हे धोरण राबवले जात आहे. कॉंग्रेसवर कोणी टीका करीत असेल, तर ते योग्य नाही. समाजात धार्मिकतेवर राजकारण टिकत नाही. ते सर्वसामान्यांना परवडत नाही, हे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.

साहित्याविषय़ी कानडे यांनी सांगितले की, मी कधीही कार्यकर्त्यांना कार्यकर्ता म्हणत नाही तर त्यांना सहकारी म्हणतो. मी जो उभा आहे तो सहकाऱ्यामुळेच मला कायदेमंडळाचा सदस्य होता आले आहे. कविता ही समाजाचे प्रतिबिंब आहे. मी कवितेतून अनेक वेदना, मांडल्या. कोणत्याही क्षेत्रात जा, भावना सारख्याच असतात. मी राजकारणी झालो म्हणजे साहित्याकडे दुर्लक्ष झाले असे अजिबात नाही. पुस्तकांशिवाय मी जगू शकत नाही. माझे काही पुस्तके नव्याने येत आहेत, असेही आमदार कानडे यांनी सांगितले.

श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे

मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेत भाषण करुन श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही माझी भूमिका मांडली. नगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे. त्यामुळे जिल्हा विभाजनाची गरज आहे. नगरसह राज्यात ज्या, जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. अशा जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे. लोकांचा होणारा त्रास निश्चित कमी होईल. वेळ वाचेल.

व्यक्तीपेक्षा पक्षाला तेथे महत्त्व आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वामुळे या परिसरात अनेक कामे होत आहेत. चांगले कामे होत असल्याने भविष्यातही सर्वच निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला चांगली संधी आहे, असेही आमदार कानडे यांनी सांगितले.

विधानसभेत जाणारे दुसरे साहित्यिक

आमदार लहू कानडे म्हणाले, मला प्रशासकीय सेवेत काम केल्याचा दांडगा अनुभव आहे. तो अनुभव मतदारसंघात काम करताना होतोय. मी कवी आहे, साहित्यिक आहे. आतापर्यंत नऊ पुस्तके लिहिलीत, सकाळ व अॅग्रोवन सह विविध दैनिकांत लेखन केलेय. विविध सन्मानाच्या पुरस्काराने गौरवलोय. राज्यभरात साहित्यिक, पत्रकारांचा मित्रमेळा आहे. खरं तर अनेक साहित्यिक विधान परिषदेवर आमदार अथवा राज्यसभेवर खासदार झाले, मी मात्र आचार्य अत्रेनंतर लोकांतून निवडून विधानसभेवर जाणारा आतापर्यंतचा दुसरा आमदार आहे. सर्वसामान्य आणि विचारधारा जपणाऱ्या मायबाप जनतेमुळे हे शक्य झाले आहे. हा साहित्यिकांचा गौरव आहे. मी साहित्यावर, संविधानावर प्रेम करणारा माणूस असून श्रीरामपुरात कार्यालयातच पाच हजार पुस्तकांचे वाचनालय काढले आहे, असेही आमदार लहू कानडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT